Popular Posts

Monday, April 20, 2020

बोधकथा




१.  एका पेन्सिलीची गोष्ट


राज अस्वस्थ होता कारण त्याने इंग्रजीच्या परीक्षेत खराब कामगिरी केली होती. त्याची आजी त्याच्याजवळ आली आणि तिने त्याला एक पेन्सिल दिली.विचारात पडलेल्या राज ने आजी कडे पहिले आणि म्हणाला “माझ्या परीक्षेतील खराब कामगिरी नंतर मी पेन्सिल घेण्यास पात्र नाही.”आजीने समजावले,” तू ह्या पेन्सिल कडून खूप चांगल्या गोष्टी शिकू शकतोस, कारण ती तुझ्यासारखीच आहे, ती पण धार लावून घेण्याचा वेदनादायी अनुभव घेते, अगदी तसाच जसा तू तुझा परीक्षेत खराब कामगिरी केल्याचा घेतला आहेस! तरीही ती तुला चांगला विद्यार्थी घडवण्यास मदत करणार आहे. ज्याप्रमाणे हे पेन्सिल च्या आतून येते त्याप्रमाणे तुलाही अडथळ्यांना पार करण्याचा बळ तुझ्यातच सापडेल. आणि शेवटी ज्याप्रमाणे पेन्सिल कुठलीही पृष्ठभागावर आपला ठसा उमटवते, त्याचप्रमाणे तुही जे काही करायला घेशील त्यावर तुझा ठसा राहील.”राजला लगेच बरं वाटलं आणि त्याने स्वतःला वचन दिले की तो इथून पुढे चांगली कामगिरी करेल.

तात्पर्य: आपल्या सगळ्यांमध्ये आपल्याला हवं ते बनण्याची क्षमता असते.

२.अरण्य व लाकूडतोडया


एकदा एक लाकूडतोड्या रानात गेला असता इकडे तिकडे पाहात रडू लागला. तेव्हा रानातल्या झाडांनी त्याला विचारले, ‘तू का रडतोस ? तुला काय हवं आहे ?’ तो म्हणाला, ‘माझ्या कुर्‍हाडीला दांडा नाही, त्यासाठी लाकडाचा एक लहानसा तुकडा मला द्याल तर बरं होईल.’ ते ऐकून झाडांना त्याची दया आली व त्याला चिंचेच्या चिवट लाकडाचा एक तुकडा दिला. लाकूडतोड्याने तो आपल्या कुर्‍हाडीला घातला व सगळी झाडे तोडण्याचा सपाटा लावला. तेव्हा एक झाड इतर झाडांना म्हणाले, ‘मित्रहो, आपण आपल्याच हाताने आपला नाश करून घेतला आहे. तेथे दुसर्‍याला नावं ठेवायला जागा नाही.’                                                                                       
तात्पर्य:  शत्रूची कीव करून त्याला साहित्य पुरविले तर शेवटी पश्चात्ताप करण्याची वेळ येते. शत्रूवरही उपकार करण्यात, त्याच्या चुकांबद्दल क्षमा करण्यात मोठेपणा आहे हे जरी खरे असले तरी ज्यामुळे आपला शत्रू बलवान होऊन आपल्यालाच उपद्रव देऊ शकेल. अशा प्रकारचे साह्य त्याला देणे हा मूर्खपणा होय.


३. बढाई खोर माणूस                                                                                                                                   
                       

 एक माणूस फार वर्षे प्रवास करून आपल्या घरी आला व आपण परदेशात असताना काय मौजा पाहिल्या हे त्याने आपल्या शेजार्‍यापाजार्‍यांना तिखट मीठ लावून सांगितले. आणि अगदी शेवटी एक थाप ठोकून दिली की, ‘मी अलकावतीला गेलो असता तेथील लोक पंधरा पंधरा हात उंच उड्या मारतात पण त्यांनी माझ्याशी पैज लावली असता माझ्याइतकी उंच उडी एकालाही मारता आली नाही.’ ऐकणार्‍या कोणालाही ही गोष्ट खरी वाटली नाही. तेव्हा त्यांची खात्री करण्यासाठी तो नाना प्रकारच्या शपथा घेऊन लागला. त्या वेळी त्या लोकातील एक माणूस त्याला म्हणाला, ‘अहो, अशा शपथा कशाला घेता. हातच्या कंकणाला आरसा कशाला ? या वेळी तुम्ही अलकावतीला आहात असं समजून तिथे जशी उडी मारली तशी इथंही मारून दाखवा म्हणजे झालं.’ हे ऐकताच त्या बढाईखोर माणसाचे तोंड ताबडतोब बंद झाले.

तात्पर्य –   आपण प्रवासात पाहिलेल्या गोष्टी फुगवून सांगण्याची काही लोकांना सवय असते, पण एखादेवेळी त्यांचेच बोलणे त्यांच्या गळ्यात येऊन त्यांची फजिती झाल्याशिवाय राहात नाही.



पावसाचा थेंब

ढगातून गळून पडलेल्या एका पावसाच्या थेंबाने आपल्या नशीबाविषयी जोरात कुरकुर केली. तो म्हणाला, ‘माझं जीवन किती निरुपयोगी आहे. आता माझा अंत होणार ! मी कोणालाही माहीत नाही, मी काही केलं नाही. मला आकाशातून हाकलून दिलं आहे. मी मुळी जन्मालाच आलो नसतो तर बरं झालं असतं ?’


तो थेंब नशिबाने एका शिंपल्यात पडला व लगेच ते शिंपले मिटले. पुढे कित्येक वर्षांनी त्या शिंपल्यातून एक अति मौल्यवान मोती निघाला व पावसाच्या थेंबाचा बादशहाच्या मुकुटात शोभणारा मोती बनला.



तात्पर्य: हलक्या कुळात जन्म घेतलेला माणूस स्वतःच्या तेजाने मोठेपणा मिळवतो.



 वात्सल्य

 एकदा देवांनी जाहीर केले की, सा-या पशूंमध्ये ज्याचे मुल सर्वात सुंदर दिसेल त्याला एक मोठे बक्षिस मिळेल. ही सूचना ऐकल्यावर सर्व पशु आपापल्या मुलांना घेऊन प्रतियोगितेच्या ठिकाणी हजर झाले. त्यातच एक माकडीण होती. तिच्या हातांच्या झुल्यात ती आपले चिमुकले पिलू झुलवत होती. नकट्या, चपटया नाकाचे, अंगावर केस असलेले ते पिलू मजेशीर दिसत होते. डोक्याचा कोबीचा कांदाच जणू! एकंदरीत ते ध्यान पाहता सारे पशू खदखदा हसू लागले.
माकडिणीला जाणवत होते की तिची टर उडवित आहेत. माकडीणीने आपल्या चिमुकल्याला हृदयाशी अधिकच कवटाळून धरले आणि ती म्हणाली, 'सुंदरपणाचे बक्षिस देवांनी हवे त्याला द्यावे, पण मला मात्र माझे मुलच सर्वात सुंदर दिसते आणि तेच माझे सर्वात मोठे बक्षिस आहे.'

तात्पर्य - आपले मूल कसेही असले तरीही प्रत्येक आई त्याच्यावरून सारे जग ओवाळून टाकते.

चढ आणि उतार
आपल्या छानदार खोगिराची एका घोडयाला घमेंड वाटत होती. हमरस्त्याने एक ओझे लादलेला गाढव चालला होता. तो त्या घोडयाला वाट करून द्यायला जरा बाजूला झाला. पण आपल्याच तो-यात घोडा उतावीळपणे त्याला म्हणाला, 'ए, जा रे, हट्. चल लवकर हो बाजूला. नाहीतर एखादी लाथच खाशील.'बिचारे गाढव गप्पच राहीले. पण घोडयाचे ते उध्दटासारखे वागणे त्याच्या मनात राहीले. काही दिवसांनी तो घोडा म्हातारा व निकामी झालेला पाहून त्याच्या मालकाने तो एका शेतकऱ्याला विकला. 
आता त्या शेतक-याच्या शेणखताची गाडी ओढून नेण्याचे काम त्याला करावे लागत होते.थकला भागला तो घोडा असाच एकदा रस्त्यावरून जात असताना पुर्वीचे ते गाढव त्याला भेटले.त्याला पाहताच खोचकपणे गाढवाने त्याला विचारले, 'ओऽहो, कुठे निघाली स्वारी? नि हे काय? तुमचं ते पूर्वीचं छानदार खोगिर नाही दिसत कुठे? काय हो अश्वराज, त्या वेळच्या त्या घमेंडीत कधी अशी पाळी येईल, असं वाटलं होतं का तुम्हाला?’

तात्पर्य - जीवनात चढ-उतार दोन्ही असतात, हे सदैव ध्यानी बाळगावे.

देवाची चोरी
 शेतात काम करता करता एका शेतक-याचे फावडे हरवले. त्याला वाटले, मजुरांपैकी कोणी ते चोरले असावे. त्याने कसून चौकशी केली, पण कोणीही कबूल होईना. कोणीही काही त्याबाबत माहीत असल्याचेही सांगेना. तेंव्हा त्या शेतक-याने सा-या मजुरांना घेऊन जवळच्या गावातील मोठया देवळात जाऊन शपथ घ्यायला लावायचे, असे ठरविले.ठरल्याप्रमाणे सर्व मजूरांना घेऊन तो शेतकरी त्या जागृत देवस्थानी गेला. देवळाच्या दारातच दवंडीवाला दवंडी पिटत होता. थाळी पिटून तो मोठमोठयाने म्हणत होता की, 'लोक हो, ऐका. आपल्या या जागृत देवस्थानातील देवांचे दागिने चोरीला गेले आहेत. चोरीची किंवा चोराची पुराव्यासह जो बित्तंबातमी देईल त्याला कोतवालसाहेब माठे बक्षिस देतील. ऐका हो, ऐका...'
ती बातमी ऐकून, शेतक-याला मोठा अचंबा वाटला, आणि तो स्वत:शीच म्हणाला, 'चला, आल्या पावली घरी परत गेलेलेच बरे. इथल्या देवाला प्रत्यक्ष त्याच्याच देवळातल्या मौल्यवान वस्तू कोणी चोरल्या ते शोधून काढता येत नाही, तर माझं फावडं चोरणारा चोर, देव कसा काय शोधून काढले.

तात्पर्य - आपल्या प्रयत्नाइतका सामर्थ्यशाली देव दुसरा कोणी नाही.

आगाऊ कयास बांधावा

  वादळी नि वाईट हवेमुळे एक शेतकरी आपल्या घरीच कित्येक दिवस अडकून पडला होता. बाहेर जाता येत नाही, अन्न आणता येत नाही, हे पाहून शेवटी त्याने आपली मेंढरे मारून खायला सुरवात केली.आणखी काही दिवस गेल्यावर त्याने आपल्या बक-यांचा फन्ना उडवला. आणखी काही दिवसांनी तर त्याने आपल्या बैलांवरही हात टाकला व आपली भूक भागवली.
हे सारे पाहून त्याचे कुत्रे एकमेकांत कुजबुजू लागले की, 'पाहिलंत ना सारं, काय केलंन आपल्या धन्यानं आतापर्यंत? अजून काही विपरित घडलं नाही, तोवरच शहाणपणानं आपली तोंडं काळी करूया आपण! अरे, जो धनी आपल्याबरोबर श्रम करणा-या बैलांनाही शिल्लक ठेवण्यास तयार नाही, तो भुकेने पिसाळल्यावर अखेर आपल्यावर देखील हात टाकणार नाही, याची शाश्वती कोणी सांगावी? चला,  आताच पळू!'  आपण! 

तात्पर्य  - जे आपल्या मित्रावरही हात टाकायला नि त्याचा दुरूपयोग करायला कचरत नाहीत, त्यांच्यापासून सावध राहून नेहमी चार हात दूर असणे बरे


जगातला मोठा गुन्हा

  एका फासेपारध्याच्या जाळयात एक पक्षी सापडला. त्याला पकडून न्यायला तो जेंव्हा जवळ आला, तेंव्हा तो पक्षी अगदी गयावया करून म्हणाला, 'पारधीदादा जाऊ द्या मला. मी वचन देतो की, तुम्ही मला सोडलात तर दुस-या पक्षांना जाळयात पकडून देईन मी.'
पारधी त्याच्यावर ओरडला, 'छे, मग तर मुळीच नाही सोडत तुला. तुझ्यासारख्या विश्वासघातक्याला कशाला सोडायचं? जो आपल्या निरूपद्रवी मित्रांचा विश्वासघात करू इच्छितो, तो साक्षात मृत्युपेक्षाही भयंकर!' 

तात्पर्य:-विश्वासघातासारखा जगात दुसरा भयंकर गुन्हा नाही.


एकमेकांना साजेशी

एकसाप एकदा नदीत पडला. पुराच्या जोरदार प्रवाहाबरोबर तो वेगाने वाहून चालला होता. तेवढयात एक काटेरी झुडुप त्याच्याजवळून वाहात चाललेले त्याला दिसले. कसेबसे तो त्याच्यावर चढून बसण्यात तो यशस्वी झाला आणि मग ते सारे लाटांवर वेगाने खाली वाहात जाऊ लागले.
किना-यावर एक कोल्हा होता. काटेरी झुडुप व त्याच्यावर चढून बसलेला साप पाहून कोल्हा म्हणाला, 'वा:! सुंदर! आत बसलेला तो प्रवासी आणि त्याला वाहून नेणारी ती नाव, दोन्हीही एकमेकांना कशी अगदी शोभून दिसतात!'

तात्पर्य : - कधी कधी चांगल्याप्रमाणे वाईट गोष्टीही जगात परस्परांना साजेशा, शोभून दिसतात.


 तोकडया दृष्टिचे विचार

           धुळीने भरलेले दोन प्रवासी. थकलेले, भागलेले, वणवण उन्हामध्ये उघडया रखरखीत रस्त्यावरून चालत होते. डोक्यावर भयंकर ऊन 'मी' म्हणत होते. इतक्यात रस्त्याच्या कडेला त्यांना एक मोठे झाड दिसले. मोठया आनंदाने ते तिकडे वळले. त्यांनी झाडाखाली आसरा घेतला. विसाव्यासाठी त्यांनी तिथेच बसकण मारली. दूरदूर विस्तारलेल्या झाडाच्या फांद्यांमुळे तिथे बराच गारवा होता. प्रवाश्यांचा कासाविस जीव झाडाच्या सावलीमध्ये सुखावला.
विश्रांती घेता घेता तिथे पहुडलेल्या एकाची नजर झाडाच्या फांदीकडे गेली. तो आपल्या सहप्रवाशाला म्हणाला, 'फुकट हे एवढं मोठ्ठं झाड आहे. फळं धरत नाही. काही नाही. काय उपयोग या झाडाचा माणसाला?'ते ऐकल्यावर संतापून झाड म्हणाले, 'किती कृतघ्न रे तूं ! तापलेल्या उन्हातून इथे आलास तो माझा आसरा घेण्यासाठी. या क्षणी प्रत्यक्ष माझ्या सावलीत बसलेला आहेस, तरीसुध्दा तू मला निरूपयोगी म्हणून हिणवत आहेस...'

तात्पर्य : - काही काही प्रकारची साधीसुधी सेवा फारच महत्त्वपूर्ण असली तरी तिचा उपयोग घेणा-यांना मात्र कसलीच कृतज्ञता वाटत नाही..



 दुष्टाचा स्वभाव

एका धनगराला एक नुकतेच जन्मलेले लांडग्याचे* पिल्लू मिळाले. ते त्याने आपल्या कुत्र्याच्या पिल्लांबरोबर वाढवले व मोठे केले. याचा परिणाम असा झाला की ज्या ज्या वेळी एखादा लांडगा कळपातले मेंढरू पळवून नेई, तेंव्हा त्याचा पाठलाग करणा-या त्या धनगराच्या कुत्र्यांमध्ये तो पाळलेला लांडगा नेहमी सामील होई. पण गंमत मात्र अशी की, त्या कळपावर दरोडा घालणा-या लांडग्याला न पकडताच परत येणे, त्या कुत्र्यांना कधी भाग पडले तर, त्यावेळी तो लांडगा तेवढा त्या दरोडेखोर इतर लांडग्याचा पाठलाग करी. अर्थात, धनगराचा लांडगाही शेवटी लांडगाच! त्या चोरीमध्ये नंतर तो इतर लांडग्यांशी गुपचूप भागीदारी करी. इतकेच नाही, तर बाहेरचे कोणी कळपातून मेंढरू न्यायला आले नाही तर, तो कळपांत वाढलेला लांडगा, स्वत:च गुपचूप एखादे मेंढरू ठार करी, व मेजवानीचा आनंद लुटी. धनगर मात्र बेसावध होता. आणि मुख्य म्हणजे, त्या लांडग्यावर विश्वासून होता. एके दिवशी लांडग्याची बदमाशी धनगराच्या ध्यानी आली. आपण इतकी वर्षे पाळलेल्या व स्वत:च मोठे केलेल्या त्या लांडग्याला धनगराने एका झाडाला लटकावून फाशी दिले. 
तात्पर्य - वाट्टेल तो प्रयत्न केला, तरी पाणी वळणावरच जाणार! दुष्टांचा नैसर्गिक दुष्टावा संस्काराने बदलून तो सज्जन होणे कधीच शक्य नाही.



मन वळवणेश्रेष्ठ

           वारा व सूर्य यांची अधिक श्रेष्ठ व शक्तीमान कोण, याबद्दल एकदा खूप हमरी-तुमरी झाली. शेवटी ते सिध्द करण्याचा एक मार्ग त्यांनी निश्चित केला. रस्त्याने जाणा-या एका प्रवाशाला त्याच्या अंगावरील कपडे काढायला लावण्यात जो यशस्वी होईल तोच श्रेष्ठ व विजयी होय, असे दोघांनी ठरविले.पवनराजाने प्रवाशावर पहिला हल्ला केला. सोसाटयाचा वारा सुटला. वा-याच्या त्या प्रचंड सोसाटयात सापडताच प्रवाशाने आपल्या अंगावरील कपडे आपल्या शरीराभोवती अधिक लपेटून घेतले. इतकेच नाही, तर वा-याने जेंव्हा अधिक उग्र स्वरूप धारण केले, तेंव्हा तर त्या माणसाने आणखी एक वस्त्र आपल्या अंगाभोवती लपेटून घेतले. 
अखेर कंटाळून जाऊन वा-याने आपण हरल्याचे कबूल केले, व त्या प्रवाशाला सूर्य नारायण कसे काय वागवतील, ह्या उत्सुकतेने वायुराज गंमत पाहू लागले. सूर्य प्रथम उबदारपणे प्रकाशू लागला, तसा प्रवासी शांत झाला. त्याने बाहेरचे लपेटलेले वस्त्र बाजूस सारले. हळुहळू आपली प्रखरता वाढवीत सूर्य तेजाने तळपू लागला. अखेर उष्णता असह्य होत चालली, तसतशी आपल्या अंगावरील सारी वस्त्रे त्या प्रवाशाने एकामागून एक काढून टाकली. या नंतरही उष्णता आणखी असह्य झाल्यावर तो प्रवासी जवळच्या नदीत अंघोळ करावयास उतरला.

तात्पर्य -बळजबरीपेक्षा कुशलपणे दुस-याचे मन वळविणे, हेच जगात अधिक यशकारक असते, हेच खरे.

 गुरू कासव

एका शहराच्या नदीकिनारी एक म्हातारा एकटाच झोपडी बांधून राहत असे. जवळपासच्या शेतामधून मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवत असे. त्याने आपल्या गरजा मर्यादित ठेवल्या होत्या. त्याने एक कासव पाळले होते, त्याच्याशी त्याचा चांगलाच स्नेह होता. शेतावरून घरी आल्यावर जेव्हा तो स्वत:साठी भाकरी बनवायला घेई, तेव्हा कासवासाठी तो चणे भिजवत असे. कासवाविषयी म्हाताऱ्याचे असे प्रेम पाहून आसपासचे लोक त्याची खिल्ली उडवत. पण म्हाताऱ्याला त्याचे वाईट वाटत नसे.
एक दिवस म्हाताऱ्याचा एक परिचित त्याला भेटण्यास आला. काही वेळ म्हाताऱ्याशी गप्पा केल्यावर कासवाला पाहून तो त्याला म्हणाला,‘ हा कसला घाणेरडा प्राणी घरात पाळला आहे? बाहेर नेऊन टाक त्याला.’ ते ऐकून म्हाताऱ्याला खूप वाईट वाटले, तो म्हणाला,‘ तुम्ही असे म्हणून माझ्या गुरूचा अपमान करत आहात.’ हे ऐकून परिचित आश्चर्याने म्हणाला, ‘हा कसा काय गुरू बुवा?’ म्हातारा त्याला समजावत म्हणाला, ‘हे पाहा, जराशी कसलीशी चाहूल लागली तर हे कासव आपले अवयव आखडून घेते. याच्या प्रत्येक वेळी असे करण्यामधून मला शिकता येते की, जगामध्ये पसरलेल्या कसल्याही दुर्वृत्ती तुम्हाला ग्रासू लागतात तेव्हा या कासवाप्रमाणे आपण आपले विचार व कृती विवेकाने संकोचल्या गेल्या पाहिजेत आणि दुष्ट प्रवृत्तींपासून परावृत्त झाले पाहिजे. अशी एवढी मोठी शिकवण यापासून मिळत आहे तर हा माझा गुरू नाही का?’

तात्पर्य - खरंतर ईश्वराने या जगाची रचना अशी केली आहे की, प्रत्येक प्राणी दुसऱ्यापासून काहीतरी प्रेरणा घेऊ शकतो आणि जर सकारात्मक दृष्टिकोनाने अशा प्रेरणा घेतल्या तर आयुष्य सुखी बनवता येऊ शकते.



यशाचे गमक

        महान शास्त्रज्ञ न्यूटन बागेत विचार करीत बसला होता. तितक्यात त्याला नोकराने हाक दिली. महाराज ! न्यूटन विचारात दंग होता. नोकराने पुन्हा साद घातली. महाराज ! आता न्यूटनची नजर नोकराकडे वळली तसा तो नोकर म्हणाला, महाराज ! बाहेर एक गृहस्थ आपणाला भेटण्यासाठी आलेत. ते आपणाला काही प्रश्न विचारु इच्छितात. खूप लांबून आलेत. न्यूटन म्हणाला, पाठव त्यांना इकडे. ते गृहस्थ आत आले.
न्यूटनला म्हणाले, क्षमा करा महाराज, मी अडाणी आहे. आपला लौकिक ऐकून आलोय. मला शहाणं व्हायचं आहे. मी काय करु ? न्यूटन म्हणाला, मित्रा, शहाणं होऊन तू काय करणार आहेस ? या प्रश्नावर तो गृहस्थ म्हणाला, मला तुमच्या यशाचं रहस्य जाणून घ्यायचं आहे. त्याचे उत्तर ऐकून न्यूटन म्हणाला, मित्रा ! एकच महामंत्र लक्षात ठेव. मन सैरभैर होऊ देऊ नकोस. तुला हवं ते ज्ञान मिळेल. पण त्यासाठी न चळणारं अवधान धारण करायला शिक. माझ्या यशाचं रहस्य हेच आहे. एकाग्र मनाला काहीही अशक्य नाही. 

तात्पर्य  - माणसाने नेहमी आपले मन एकाग्र ठेवले पाहीजे...त्यामुळे यश नक्कीच मिळते.


 घोडा आणि नदी

    एकदा एका माणसाला त्याच्या घोड्यासमवेत एक नदी पार करायची असते. परंतु त्याला नदीची खोली माहीत नसल्याने तो तिथेच काठावर विचार करत बसतो. मदतीसाठी आजुबाजुला पाहत असताना त्याला तेथे एक लहान मुलगा दिसतो. तेव्हा त्या माणसाने लहान मुलाला नदीच्या खोलीबद्दल विचारले.मुलाने घोड्याकडे एकदा पाहीले आणि क्षणभर थांबुन तो विश्वासाने म्हणाला, " निश्चींतपणे जा, तुमचा घोडा नदी सहज पार करु शकेल".
मुलाचा सल्ला मानुन त्या माणसाने नदी पार करण्यास सुरुवात केली. परंतु नदीच्या मध्यावर पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आले की नदी खुप खोल आहे. आणि तो जवळ जवळ बुडायलाच आला.
कसाबसा तो त्यातून सावरला आणि बाहेर येउन त्या मुलावर जोरात खेकसला. मुलगा पुरता घाबरला होता आणि घाबरत घाबरतच बोलला, "पण माझी बदके तर खुप लहान आहेत आणि ते दररोज नदी पार करतात. त्यांचे पाय तर तुमच्या घोड्यापेक्षा खुप लहान आहेत."

तात्पर्य  - उगाच कोणाचाही सल्ला ऐकण्याआधी त्यांना खरोखरच काही माहीती आहे का ते जाणुन घ्या.... .


अप्रामाणिक लाकुडतोडयाची गोष्ट

 प्रामाणिक लाकुडतोड्याला जलदेवतेने सोने, चांदी आणि लोखंडाच्या तीन कुर्‍हाडी बक्षिस दिल्या. त्याने त्या जपून ठेवल्या आणि प्रामाणिकपणे जगत राहिला. त्याच्यापुढच्या पिढ्या मात्र नालायक निघाल्या. त्यांनी त्या सोन्याचांदीच्या कुर्‍हाडी विकून खाल्या.लाकुड तोडून काही फार कमाई होत नव्हती. या अप्रामाणिक लाकुडतोड्याच्या डोक्यात एक चमकदार कल्पना आली. त्याच विहीरीत ही लोखंडी कुर्‍हाड टाकून प्रामाणिकपणाचे नाटक करुन आपण्ही सोन्या चांदीच्या कुर्‍हाडी मिळवू शकतो.
त्याने त्या विहीरीत मुद्दाम कुर्‍हाड टाकली. जलदेवतेचा धावा सुरु केला.थोड्या वेळाने मिष्किल हसत जलदेवता बाहेर आली. हातात तीन कुर्‍हाडी होत्या, एक लोखंडाची, दुसरी चांदीची, तिसरी सोन्याची. 'यातली तुझी कुर्‍हाड कुठली ती घे', देवता म्हणाली. आता नाटक करणे शक्य नव्हते. चरफडत लाकुडतोड्याने आपली लोखंडी कुर्‍हाड घेतली आणि देवता अंतर्धान पावली. 

तात्पर्य - अती लोभ करू नये,त्यामुळे आपले कधीही नुकसानच होते.


 कोळी आणि चिमुकला मासा

           एक कोळी होता. रोज मासे पकडायचे, ते विकायचे, आणि जे पैसे येतील त्यावर उपजीविका करायची असा त्याचा जीवनक्रम होता. एक दिवस, दिवसभर प्रयत्न करूनही त्याला मासे सापडले नाहीत. शेवटी संध्याकाळी त्याच्या जाळयात लहानसा मासा सापडला.तो मासा, कसेबसे श्वास घेत कोळयाला म्हणाला, 'बाबारे, मी तुझ्याकडे माझ्या प्राणांची भीक मागतो. मी इतका लहान आहे की, माझी बाजारात काहीही किंमत यायची नाही. कोणी मला खाल्ले तर त्याचे पोट देखील भरणार नाही. माझ्या शरीराची अजून वाढ व्हायची आहे. कृपा कर. मला पुन्हा पाण्यात सोडून दे. मी मोठा गरगरीत झाल्यावर माझा मेजवानीसाठी उपयोग होईल. त्यावेळी मला विकून तुला खूप पैसे मिळतील. आज तू मला सोडून दे.'
कोळी त्या माशाला म्हणाला, 'उद्याचे कोणी पाहिले आहे? शंकांनी घेरलेल्या उद्याच्या लाभासाठी आजच्या हातात गवसलेल्या लाभावर पाणी सोडणे अगदी मूर्खपणाचे कृत्य होईल. त्यामुळे मी तुला सोडू शकत नाही.

तात्पर्य - झाडातल्या दोन पाखरांच्या मागे लागून, हातातले एक गमावून बसण्यात अर्थ नाही.


मैत्रीच्या मर्यादा

           एका गावाच्या एका पेठेत एक कोळसेवाला राहात होता. जवळच एक धोबी राहावयास आला. त्या दोघांची चांगली ओळख झाली. कोळसेवाल्याला वाटले, 'धोबी फार चांगला मनुष्य आहे. आपल्या अर्ध्या घरात तो राहीला तर सोबत होईल नि हळुहळू परस्परांची मैत्रीही वाढत जाईल.'एक दिवस कोळसेवाल्याने धोब्याला आपल्या मनातील विचार बोलून दाखविले. कोळसेवाला पुढे म्हणाला, 'या महागाईच्या दिवसांत आपल्या खर्चात तेवढीच बचत होईल. शिवाय एकमेकांना सोबतही होईल!'
'फार फार आभारी आहे. तुम्ही खरोखरच फार चांगले आहात!' धोबी त्याला नम्रपणे म्हणाला. 'बाकी सर्व ठीक आहे हो, पण तुमचं आमचं एकत्र राहाणं जमायचं नाही. कारण मी जीवाचा आटापीटा करून जे जे स्वच्छ करीत जाईन, ते ते एका क्षणांत काळंकुट्टं होईल, तुमच्या शेजारानं! माफ करा !'

तात्पर्य  - चांगल्या हेतूने होणा-या मैत्रीलाही परिस्थितीच्या नैसर्गिक मर्यादा असतात.


 चतुर व्हा

सध्याच्या जगाला लाडीलबाडी व प्रत्येक क्षेत्रातील जीव घेणी स्पर्धा , या दोन गोष्टींनी ग्रासलं आहे . भारताचे भावी आधारस्तंभ असलेल्या माझ्या बाल मित्र-मैत्रिणींनो, आपल्या अंगचा सज्जनपणा न सोड्ता, जर या परिस्थितीवर मात करुन तुम्हाला आपली ध्येये साध्य करायची असतील तर, अंगी चातुर्य बाणविण्याची आत्यंनतीक गरज आहे.परंतु 'चातुर्य' म्हणजे काय , हे ठाऊक आहे ? चातुर्य म्हणजे शहाणपणा, धोरणीपणा , मुत्सद्दीपणा, हजरजबाबी वृत्ती, धुर्तपणा, दूरदर्शीपणा, प्रसंगावधानता वगैरे गुणांच माणसाच्या डोक्यात तयार झालेलं एकजीव असं रसायन.माणूस केवळ विद्वान असल्याने त्याचा या जगात निभाव लागत नाही. अंगी चातुर्य नसलेला विद्वान एखाद्या प्रसंगात सापडला, तर आपण या प्रसंगात का सापडलो, याची मुद्देसुद मीमांसा ही इतरांपुढे करीत बसतो, परंतु अंगी चातुर्य असलेला माणूस असे विवरण करीत न बसता, आल्या प्रसंगावर मात करतो आणि आपली यशाची वाटचाल आक्रमू लागतो; थोडक्यात सांगायचं तर, विद्वत्ता ही नुसती बोलघेवडी असते, तर चातुर्य हे कृतिशील म्हणजे प्रत्यक्ष कृती करुन दाखविणारे असते. 
म्हणून जोश बिलिंग्ज नावाचा पाश्चात्य विचारवंत म्हणतो,अंगी चातुर्य नसलेली माणसं भोवताली कितीही असली, तरी एकटा चतुर माणूस त्या सर्वांवर मात करु शकतो. आगऱ्यास औरंगजेबाच्या कैदेत सापडलेल्या शिवप्रभुंनी फ़ुलादखानाच्या पहाऱ्यातून आपल्या पुत्रासह पलायन केले, ते चातुर्याच्या जोरावरच ना ? 

तात्पर्य - बाजारबुणगे जरी संख्येनं बरेच असले, तरी धूर्त म्हणजे चतूर माणूस त्यांना ताब्यात ठेवतो. धूर्तापुढे त्या अलबत्या गलबत्त्यांचे काहीएक चालत नाही.


 चोरावर मोर

रानात बोरं आणण्यासाठी चाललेल्या एका बारा तेरा वर्षाच्या मुलाला तहान लागली, म्हणून तो वाटेत लागलेल्या विहिरीत पाणी आहे किंवा काय, हे पाहण्यासाठी त्या विहिरापाशी गेला. त्या विहिरीत तो डोकावून पाहू लागला असता, त्याला समोरुन एक उग्र व खुनशी चर्येचा चोर पाठीवर गाठोडं घेऊन, आपल्याच दिशेने येत असलेला दिसला.हा चोर एकतर आपल्याला मारील, किंवा पळवून नेऊन चोर्‍या करायला लावील,' असं वाटल्यावरुन तो मुलगा त्या विहिरात पाहून मुद्दाम हमसाहमशी रडू लागला.त्या रडणार्‍या मुलाजवळ येऊन त्या चोरानं विचारलं, काय रे? तुला रडायला काय झालं?'तो मुलगा आपल्या रडण्यात खंड पडू न देता त्याला खोटच म्हणाला, ‘मी या विहिरीत किती पाणी आहे हे पाहण्यासाठी वाकून पाहू लागलो असता, माझ्या गळ्यातली सोन्याची कंठी या विहिरीत पडली. आता कंठीशिवाय जर मी घरी गेलो तर आई-बाबा मला बेदम चोप देतील.'
तुझी कंठी तुला काढून देतो, असं त्या मुलाला खोटचं सांगून, आणि चोरीचे पैसे व दागिने यांनी भरलेलं आपलं बोचकं त्याला विहिरीबाहेर उभे राहून सांभाळायला सांगून आपण विहिरीत उडी मारावी व कंठी हाती लागताच, आपले बोचके व याची कंठी घेऊन आपण पसार व्हावं, असा बेत त्या चोरानं मनाशी केला. त्याप्रमाणे तो त्या मुलाला म्हणाला, ‘बाळा ! तू हे माझं बोचक सांभाळ; मी तुला तुझी कंठी विहिरीतून काढून देतो.’
त्या हुशार मुलाला चोराच्या मनातलं कळून आलं तरीही त्याने मुद्दाम त्या चोराला होकार दिला. त्याबरोबर त्या चोरानं विहिरीत उडी मारुन, तिच्या तळाशी त्या कंठीचा शोध सुरु केला. ही संधी साधून तो मुलगा त्या बोचक्यासह तिथून पसार झाला.गावात जाताच त्या मुलाने ते बोचके पोलिसठाण्यावर नेऊन दिले. पोलीसांनी घोड्यावर स्वार होऊन त्या चोराचा पाठलाग केला व त्याला पकडले. नंतर त्या मुलाच्या प्रामाणिकपणाबद्दल व चातुर्याबद्दल त्यांनी त्याला बक्षीस दिले.

राजा शरमिंधा झाला

कवी गुरु कालीदास हा एका कलावंतिणीला गाणं शिकवायला जाई. राजा भोजही तिच्याकडे अधूनमधून तिचं नृत्य पाहायला जाई. आपण जिच्याकडे जातो, तिच्याकडे कालीदासही जातो, असं कळताच राजानं त्याची फजिती करायचं ठरवलं.
तो त्या कलावंतिणीकडे गेला असता तिला म्हणाला, 'हे पहा शुभानना, कालीदास आज तुझ्याकडे येईल तेव्हा त्याला सांग की, संपूर्ण हजामत केल्याशिवाय उद्या तुम्ही माझ्याकडे यायचं नाही.'कलावंतिणीने कालीदासाला याप्रमाणं सांगताच याच्यामागे राजाचा हात असल्याचा त्याला संशय आला. तो तिला म्हणाला,‘ खरं सांग, तू मला हे जे हजामत करून यायला सांगितलंस, ते महाराजांच्या सांगण्यावरुन ना?’
तिनं ते मान्य करताच कालीदास तिला म्हणाला, 'महाराज या राज्याचे राजे असतील, पण मी तुझा गुरु आहे. तेव्हा त्यांच्यापेक्षा तू मलाच अधिक मानले पाहिजेस. म्हणून मी सांगतो तसं करायचं. मी तर तुझ्या इच्छेप्रमाणे उद्या रात्री संपूर्ण क्षौर करुन येतोच पण मी येऊन गेल्यानंतर महाराज तुझ्या घराचे पुढले दार ठोठावू लागले की त्यांना तू म्हण, महाराज ! गाढवासारखा आवाज काढल्याशिवाय मी आज आपल्याला आत घेणार नाही. तुझ्या भेटीसाठी आतूर झालेले महाराज तुझा हट्ट पुरविण्यासाठी तसे ओरडायला कमी करणार नाहीत.’
दुसर्‍या दिवशी राजा त्या कलावंतिणीकडे गेला व तिने हट्ट धरल्यामुळे गाढवासारखा ओरडला. त्याच्या दुसर्‍या दिवशी कालीदासाला हजामत करुन दरबारात आल्याचे पाहून भोजराजानं खवचटपणे त्याला विचारलं, ‘काय कविराज ! आपण आज संपूर्ण क्षौर का बरं केलयं ?’यावर कालीदासानं उत्तर दिलं, ‘काल रात्री मी गाढवाचा आवाज ऎकला. गाढवाचा आवाज रात्री कानी पडला म्हणजे संकट ओढवतं, असं मानलं जातं. ते संकट येऊ नये म्हणून क्षौर करावं, असं शास्त्र सांगतं.’ कालीदासाच्या या चपलख उत्तरानं राजा शरमिंधा झाला.

घामाचा पैसा

 धन्नाशेटचा मुलगा राम अगदीच आळशी. घरांत गडगंज संपत्ती. एकुलता एक लाडाचा. काम कधी करावंच लागलं नाही. आता २१ वर्षाचा झाला. शेठजींना काळजी पडली. याचे कसे होणार साठलेला पैसा किती दिवस पुरेल. दुसरे दिवशी त्यांनी मुलाला बोलावले व म्हणाले हे बघ आज तू सकाळीच बाहेर जा. काहींतरी काम करून पैसे मिळवुन आण तरच तुला जेवायला मिळेल' मुलाला काहीच कळेना. तो बहिणीकडे गेला तिने त्याला एक रूपया दिला. शेठजींनी तो विहीरीत फेकून दिला. दुसर्‍या दिवशी आईकडून घेतला तिसर्‍या दिवशी मात्र कोणीही पैसे द्यायचे नाहीत हे उमजल्यावर स्वारी घराबाहेर पडली स्वारी घराबाहेर काम शोधायला निघाली. पण काय काम करणार ? बारा वाजे पर्यंत हिंडला. काम मिळेना. पोटात कावळे कोकलायला लागले. स्टेशनवरून एक जड बॅग घेऊन येणारा माणूस दिसला त्याला हमाल हवा होता. हा धावत पुढे गेला. 'साहेब, इकडे आणा'. ती बॅग त्याने डोक्यावर उचलली. घामाघूम झाला. साहेबांनी आठ आणे हातावर ठेवले. घरी आला. शेठजींच्या हातावर आठ आणे ठेवले. दोन दिवसाप्रमाणेच शेठजींनी ते विहीरीत फेकले हा चवताळून उठला. 'बाबा अहो तेवढे आठ आणे मिळवायला मला किती वणवण करावी लागली आणि तुम्ही ते फेकून दिलेत ?' शेठजींनी त्याला जवळ घेतले. पाठीवरून हात फिरवला, 'बाळा आता मला काहीं काळजी नाहीं कारण खर्‍या कष्टाची किंमत तुला आज कळली. दोन दिवस ह्याच्या दुप्पट रक्कम फेकली पण तुला राग आला नव्हता कारण त्या मागे कष्ट नव्हते.

तात्पर्य - स्वकष्टाची कमाई तीच खरी कमाई.


हे विश्वची माझे घर, 

‘संत तुकाराम महाराजांनी देहू गावाबाहेरच्या एका ऊसाच्या मळ्याची काही दिवस राखण केली; म्हणून त्या मळ्याच्या मालकाने त्यांना पंचवीस-तीस उसांची एक मोळी दिली. दोरखंडाने बांधलेली ती मोळी खांद्यावर घेऊन संत तुकाराम महाराज घराकडे चालले असता वाटेत खेळणारी मुले त्यांना विचारू लागली, ‘‘तुकोबा, एवढे ऊस तुम्ही कोणासाठी घेतले हो ?’’ ते म्हणाले, ‘‘बाळांनो, अरे तुमच्यासाठीच. बंडू हा ऊस घे तुला, गुंडू हा तुला, धोंडू हा घे, तू पण.. हा, तू घे… हा, तू घे.’’ असे म्हणत तुकोबा ज्या वेळी त्यांच्या घरी पोहोचले, त्या वेळी त्यांच्या खांद्यावर एकच ऊस आणि त्याच्या भोवतीचे दोरखंडाचे भले मोठे वेटोळे एवढेच काय ते शिल्लक राहिले होते. तो प्रकार पाहून तुकाराम महाराजांची पत्नी आवळी भरपूर रागावली. आपल्याला मिळालेला सर्व ऊस लोकांच्या मुलांना देऊन आपल्या मुलांना काही आणले नाही; म्हणून ती तुकाराम महाराजांना नको नको, ते बोलली आणि रागाच्या झपाट्यात तिने तो उसाचा तुकडा त्यांच्या पाठीवर मारला. 
त्या वेळी त्याचे तीन तुकडे होऊन एक तुकडा तिच्या हातात राहिला आणि दोन तुकडे जमिनीवर पडले. तेव्हा संत तुकाराम महाराज शांतपणे तिला म्हणाले, ‘‘आवळे, किती ग धोरणी तू ? आता तू सारखे वाटे केलेस. जो तुकडा तुझ्या हातात राहिला, तो तुझा आणि खाली जे पडले त्यांतील एक माझा अन् दुसरा मुलांचा !’’ ही त्यांची शांत वृत्ती पाहून बायकोला फार पश्चात्ताप झाला. 

तात्पर्य - ‘हे विश्वची माझे घर’, असे वाटत असल्यामुळे संत तुकाराम महाराजांनी आपली मुले आणि लोकांची मुले असा भेदभाव केला नाही.




न्याय

लोकांचे धान्य दळून देणार्‍या एका माणसाने एके दिवशी आपल्या धान्याच्या टोपलीत एक उंदीर पकडला व त्यास आपल्या आवडत्या मांजरास खाऊ घालण्याचा विचार केला. त्यावेळी तो उंदीर दीनवाणें तोंड करून त्याला म्हणाला, 'बाबारे लोकांचं धान्य चोरावं हा माझा धंदा नाही.' लोकांच्या घरातून मी जे अन्न घेतो, ते केवळ पोटापुरतेच घेतो,' ही सबब ऐकून तो माणूस म्हणाला, 'अरे, मी तरी तुला जी शिक्षा करणार आहे, ती सार्वजनिक हितासाठीच करतो आहे.
 कारण तुझ्यासारख्या चोराला शिक्षा करणं हे प्रत्येक नागरिकाचं काम आहे,' हे ऐकून उंदीर म्हणाला, 'बरं तर, तू आणि मी दोघंही एकाच वर्गात मोडतो याचा विचार कर. आपण दोघेही धान्यावरच आपला चरितार्थ चालवतो. अंतर इतकंच की दळायला आलेल्या धान्यातला एक दाणा जर मी चोरला तर त्यातले हजार दाणे तू चोरतोस.' तो माणूस रागावून त्यावर म्हणतो, 'प्रामाणिक माणसाने शांतपणे ऐकून घेण्याजोगे हे तुझे बोलणे नाही.' व लगेच त्याने त्या उंदरास आपल्या मांजरीस देऊन टाकले.

तात्पर्य - ज्या व्यंगाबद्दल आपण दुसर्‍यास नावे ठेवतो, तेच व्यंग आपल्या अंगी आहे असे दाखवून दिले, तर त्याचा आपल्याला राग येतो, पण हा काही न्याय नव्हे.


 सदाचार

महाभारतकालीन राजा सत्यदेव एक दिवस सकाळी उठले, तर त्यांना एक सुंदर स्त्री राजवाड्यातून बाहेर पडताना दिसली. राजाने आश्‍चर्यचकित होऊन त्या स्त्रीला हात जोडून नम्रपणे विचारले, ‘आपण कोण आहात ?’ त्यावर त्या स्त्रीने सांगितले, ‘मी लक्ष्मी आहे, आता या राजवाड्यातून मी जात आहे.’ तेव्हा राजाने तिला सांगितले, ‘तू जाऊ शकतेस.’ लक्ष्मी बाहेर पडली. नंतर लक्ष्मीच्या पाठोपाठ एका सुंदर पुरुषाला राजवाड्याबाहेर पडताना पाहून राजाने त्यालाही विचारले, ‘आपण कोण आहात ?’ त्याने उत्तर दिले, ‘माझे नाव ‘दान’ आहे. लक्ष्मी बाहेर गेल्यानंतर आपण दान करू शकणार नाही; म्हणून मीही तिच्यासह जात आहे.’ राजाने सांगितले ‘आपणसुद्धा राजवाडा सोडून जाऊ शकता.’ त्यानंतर त्याच्या पाठोपाठ तिसरा पुरुष ‘यश’ निघून गेला. त्यानंतर चौथा पुरुष प्रकट झाला अन् बाहेर पडू लागला. तेव्हा राजाने त्यालाही हात जोडून नम्रपणे त्याचे नाव विचारले. तो पुरुष म्हणाला, माझे नाव ‘सदाचार ! राजाने त्याला म्हटले, ‘मी तर तुझा कधीच त्याग केला नाही. तू मला सोडून का जात आहेस ? तुझ्यासाठीच मी लक्ष्मी, दान आदींचा त्याग केला आहे. मी तुला जाऊ देणार नाही. तू मला सोडून गेलास, तर माझे सर्वस्व जाईल !’ राजाचे हे बोल ऐकून सदाचार राजवाड्यातच थांबला. सदाचार बाहेर पडला नाही, हे पाहून बाहेर गेलेली लक्ष्मी, दान आणि यशही परत आले.

तात्पर्य :- सदाचाराने वागणे हेच आयुष्याचे सर्वस्व आहे. जीवनात सदाचार (नीतीमत्ता, धर्माचरण आदी) नसेल, तर दान, लक्ष्मी (श्रीमंती) आदींचा काहीच उपयोग नाही.


अडवणूक 

एक कुत्रा गोठ्यातल्या गव्हाणीत बसला असता तेथे एक भुकेला बैल गवत खायला आला. पण तो कुत्रा त्याला गवत खाऊ देईना. तो त्याच्या अंगावर भुंकू लागला. तेव्हा बैल त्याचा धिक्कार करून त्याला म्हणाला, 'अरे. क्षुद्र प्राण्या, हे गवत तूही खात नाहीस नि मलाही खाऊ देत नाहीस.तु मला असे अडवून तुला ह्या गवताचा काय फायदा होणार.त्यापेक्षा माझे पोट मला भरु दे तु असा विनाकारण मला ञास देऊ नकोस, तुझ्या या अशा वागण्यामुळे तुला सदा दारिद्रय अवस्था येईल असे.'

तात्पर्य - काही लोक इतक्या छोट्या  मनाचे आणि दृष्ट विचारांची  असतात की एखाद्या वस्तूचा स्वतःला उपयोग नसला तरी दुसर्‍याला त्याचा उपयोग करू न देता ती अडवून ठेवतात.चांगल्या विचारातुनच चांगली कृती घडते.म्हणून विचार चांगले ठेवा.


कावडीवाला

एका गावात एक कावडीवाला राहत होता .तो रोज पाणी भरण्यासाठी कावडीचा उपयोग करत असे.कावडीला मातीच्या घागरी लावाल्या होत्या.कावडीवाला दररोज विहिरीवरून घरी पाणी आणत असे.एके दिवशी मातीच्या एका घागरीला छोटस छिद्र पडलं .त्यामुळे विहिरीवरून घरापर्यंत येताना पाणी छिद्रातून वाहून जात असे.या गोष्टीचे घागरीला खूप वाईट वाटले.ती घागर कावडीवल्याला म्हणाली की माझा तुम्हाला काहीही उपयोग होत नाही आहे तेव्हा तुम्ही मला का फेकून देत नाही .तेव्हा कावडीवाला म्हणाला की ज्या बाजूने पाण्याचे थेब पडत होते त्या बाजूने मी बी पेरले होते .आता त्या ठिकाणी रोपे उगवली आहे काही दिवसांनी फुले लागतील फळ लागतील .हे ऐकून घागरीला खूप आनंद झाला म्हणजे आपला सुद्धा उपयोग होतो.

तात्पर्य- जीवनामध्ये सर्व जणांचा उपयोग होतो .कोणीही आपल्याला कमी लेखू नये.


राजा आणि संत 

एका वनात दोन संत राहत होते. एकांतात आपल्‍या तपश्‍चर्येत लीन राहत होते. कधीतरी यात्रेकरूंचा जत्‍था जायचा तेव्‍हा ते संत त्‍यांच्‍याशी बोलत असत. त्‍याच यात्रेकरूकडून त्‍यांना तेथील राजास त्‍या संतांबाबत माहिती मिळाली. तो या दोघांना भेटण्‍यास निघाला. जेव्‍हा संतांना ही गोष्‍ट कळाली.तेव्‍हा त्‍या दोघांना वाटले की आता राजा येणार व त्‍याने आपला चांगूलपणा पाहिला तर तो आपणास सतत भेटण्‍यास येईल, त्‍याच्‍याबरोबर अनेक माणसे येतील, त्‍यां माणसांच्‍या संगतीने अजून काही माणसे येतील व अशाने या वनातील शांती भंग पावेल व एकांत मिळणार नाही व एकांत नसल्‍याने आपणास ध्‍यानसाधना करता येणार नाही. राजा आम्‍हाला दोघांना सामान्‍य माणूस समजेल असे काहीतरी केले पाहिजे. राजाचा लवाजमा तेथे पोहोचला तेव्‍हा राजाने पाहिले की ते दोघेही संत हातात लाठ्याकाठ्या घेऊन एकमेकांशी भांडत होते. पहिल्‍या संताने दुस-याला म्‍हटले,'' तू स्‍वत:ला कोण समजतोस, मी इतके ज्ञान मिळविले आहे की ते तू सात जन्‍मातही मिळवू शकणार नाही.'' 
दुसरा संत त्‍यावर म्‍हणाला,'' अरे तू तर पक्का खोटारडा आहेस, तुझ्या ज्ञानाच्‍या गप्पा मारून तू लहान मुलाला फसवू शकशील पण मला नाहीस. तुझ्यापेक्षा जास्‍त ज्ञान मी माझ्या शिष्‍यांना दिले आहे.'' राजाने व त्‍याच्‍याबरोबरच्‍या लोकांनी हे भांडण पाहिले व विचार करू लागले हे साधू संत तर सामान्‍य माणसाप्रमाणेच भांडत आहेत व त्‍यांनी सर्वांनी असल्‍या साधूसंतांचा संग नको म्‍हणून वनातून जाणेच पसंत केले. राजा व लोक जाताच दोन्‍ही संतांनी एकमेकांकडे पाहून मंदस्मित केले व गळाभेट घेतली. दोन्‍हीही साधू आपल्‍या साधनेत रममाण झाले.

तात्पर्य - चांगली गोष्‍ट घडवून आणण्‍यासाठी कधीकधी चुकीच्‍या मार्गाचाही अवलंब करावा लागतो.


आठवण उपदेशाची

एकदा काही पाखरे एका घुबडाला म्हणाली, 'तू आपलं घर पडक्या भिंती किंवा जुन्या झाडाच्या ढोलीत का बांधतोस? त्यापेक्षा हिरव्यागार झाडांवर बांधलंस तर किती चांगलं होईल !'त्यावर घुबड म्हणाले, 'अरे वेड्यांनो, पक्षी धरण्याकरता झाडांवर चिकटा लावतात. तेव्हा अशा झाडावर राहाण्यापेक्षा एखाद्या सुरक्षित जागी राहाणं हे अधिक योग्य नाही का ? आता इथे सुख कमी आहे ही गोष्ट खरी, पण इथे भीती नाही.'
पण त्या घुबडाचे म्हणणे त्या पाखरांना रुचले नाही. ती बाहेर एका झाडावर उड्या मारत राहिली. थोड्या दिवसांनी एका पारध्याने तेथील झाडावर जागोजागी चिकटा लावला. त्यात ती पाखरे सापडली. पारध्याने त्यांना धरले तेव्हा त्यांना घुबडाच्या उपदेशाची आठवण झाली. आपण त्याचे ऐकले नाही याबद्दल त्यांना फार पश्चात्ताप झाला.

तात्पर्य - कोणी चांगले सांगितले तर त्यांचे ऐकून विचार करून कृती करावी. नाहीतर नंतर  पश्चात्ताप होतो.



  सकारात्मक दृष्टिकोन

एकदा एका मैत्रीणच मुलं झाडावर चढली होती. मुलं झाडावर उंच पोहचल्यावर अचानक जोराचं वादळ आलं. ते झाड वा-यानं गदागदा हालू लागलं.पहिल्या मुलाची आई तिच्या मुलाला म्हणाली, "पडशील" तर दुस-या मुलाची आई म्हणाली, "सांभाळ, घट्ट पकडून ठेव". खरंतर दोन्ही मैत्रिणींना आपापल्या मुलांना पडण्यापासून वाचवायचं होतं. परंतु त्यांच्या मुखातून निघालेल्या संदेशांमध्ये मात्र विरोधाभास होता. 
परिणामी पहिल्या स्त्रीचा मुलगा फांदीवरेन घसरून खाली पडला.मात्र दुस-या स्त्रीच्या मुलानं फांदी घट्ट धरून ठेवली आणि तो अलगद उतरून खाली आला.काय बरं असेल यामागचं कारण?पहिल्या स्त्रीच्या शब्दामध्ये नकारात्मकता होती. जी तिच्या मुलानं ग्रहण केली आणि तो पडला.या उलट दुस-या स्त्रीनं उच्चारलेल्या शब्दांमध्ये सकारात्मकता असल्याने तिच्या मुलानं ती ग्रहण केली आणि तो फांदीवर आपले पाय घट्ट रोवून बसला.
  "वास्तु करी तथास्तु" वास्तुशास्त्र देखील हेच सांगतय की आपल्या वास्तुत नेहमी सकारात्मक भाषा वापरा,सकारात्मक कल्पनाचित्रे निर्माण करा,मग वास्तुच तुम्हाला तथास्तु म्हणुन सकारात्मक बदल देईल;म्हणूनच आपल्या प्रार्थनेवर आणि आदेशांवर नेहमी पूर्ण विश्वास असायला हवा. 
तात्पर्य - योग्य आदेश देण्याची कला आत्मसात करा.



माणुसकी

एका बर्फाच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीची ही गोष्ट आहे.कामाचा वेळ संपत आला होता सगळे घरी जाण्यासाठी तयार होते.तेवढ्यात कंपनीमध्ये थोडा तांत्रिक बिघाड झाला. म्हणून तो व्यक्ति तो बिघाड दुरुस्त करायला गेला. त्याला काम करण्यात खुप उशीर लागला.तोपर्यंत प्लांट बंद झाला.लाइट बंद करून दरवाजे सील करण्यात आले.अशा परस्थितित त्याचा बर्फ आणि थंडी ने जिव जाणे,निश्चित होते.त्या माणसाला काही सुचेनासं झालं,पण तासा भरात एक चमत्कार झाला. आणि कोणी तरी दरवाजा उघडला.
तो समोर पाहतो तर सुरक्षा रक्षक हातात टॉर्च घेऊनउभा होता.त्याने त्याला बाहेर काढून त्याचा जिव वाचवला.प्लांट बाहेर आल्यावर त्याने सुरक्षा रक्षकाला विचारले,"तुम्हाला कसे कळले की मी आत अडकलोय."सुरक्षा रक्षक म्हणाला,"या प्लांट मध्ये जेवढे लोक काम करतात त्यात तुम्ही एकटेच असेआहात की जे रोज मला येताना नमस्कार आणि जाताना राम राम बोलताआणि आज सकाळी तुम्ही कामावर आलात पणसंध्याकाळी गेला नाहीत.म्हणून माझ्या मनात शंका आली आणि मी पाहायला आलो."त्या व्यक्तीला कधी वाटले देखील नव्हते की त्याचेएखाद्याला एवढा छोटा सन्मान देणे,एक दिवस त्याचा जिव वाचवेल.म्हणून नेहमी लक्षात ठेवा,जेव्हा कधीही कोणाला भेटाल तेव्हा त्याच्या सोबत हसून सन्मान पूर्वक बोलून मग पुढे जा.माणूसकीच तुम्हांला शेवट पर्यंत साथ देईल.

तात्पर्य - सर्वांबरोबर माणूसकीने वागा.


 मैत्री

एका बागेत एक लहान पोपट रहात असे. त्याची व एका चिमणीची मैत्री झाली. चिमणी बागेत इकडेतिकडे उडया मारून आपले भक्ष्य मिळवीत असे व वरचेवर येऊन त्या पोपटास भेटत असे. तिचा प्रेमळ स्वभाव पाहून पोपटास आनंद होत असे.तो एकदा आपल्या आईस म्हणाला, ‘आई, ही चिमणी किती चांगल्या स्वभावाची आहे! इतकी चांगली मैत्रीण दुसर्‍या कोणास क्वचितच लाभली असेल.’ हे ऐकून त्याची आई म्हणाली, ‘आणि तुझ्यासारखा मूर्ख मुलगाही दुसर्‍या कोणास क्वचितच लाभला असेल! ‘अरे,ही चिमणी आज तुला इतकी चांगले वाटते आहे, पण उदया हिवाळा सुरू झाल्यावर तू जेव्हा थंडीत कुडकुडत बसशील, तेव्हा ही मात्र तुझ्यापासून लांब कुठेतरी मजा करीत असेल.’

तात्पर्य - कोणत्याही माणसाशी मैत्री करण्याआधी त्याच्या स्वभावाची चांगली पारख करून घ्यावी.



मोह

एक भिकारी दिवसभर पुष्कळ नामजप करायचा. देवाला त्याची दया आली. एक दिवस देव प्रगट झाला आणि त्याने भिका-याला ‘काय हवे ते माग’, असे सांगितले. भिका-याने सोन्याच्या मोहरा मागितल्या. देव म्हणाला, ‘‘मोहरा कशात घेणार ?’’ भिका-याने झोळी पुढे केली. मोहरा ओतण्यापूर्वी देव म्हणाला, ‘‘तू ‘पुरे’म्हणेपर्यंत मी मोहरा ओतत राहीन; पण एक अट – मोहरा झोळीतून भूमीवर पडता कामा नयेत. भूमीवर पडलेल्या मोहरेची माती होईल.’’ भिका-याने अट मान्य केली. देव भिका-याच्या झोळीत मोहरा ओतू लागला. हळूहळू झोळी भरत आली. भिका-याला सोन्याचा मोह आवरेनासा झाला. मोह-यांच्या भाराने आता झोळी फाटू शकते, हे लक्षात येऊनही भिकारी ‘पुरे’ म्हणेना. शेवटी व्हायचे तेच झाले. झोळी फाटली आणि सर्व मोहरा मातीमोल झाल्या!समाधानी वृत्ती नसलेला भिकारी दुर्दैवी ठरला

तात्पर्य – समाधानातच सुख मानावे.

गुरुपदेश

एका गुरूकडे एक शिष्य रोज यायचा आणि म्हणायचा मला गुरुपदेश द्या. त्यावेळी गुरु म्हणायचा, ‘उद्या ये.’ तो उद्या आला की म्हणायचा, ‘उद्या ये.’ असे दहा दिवस झाल्यावर शिष्य म्हणाला, ‘द्या ना गुरुपदेश !’ त्यावेळी ते म्हणाले, ‘एकटा येरे, किती जणांना बरोबर आणतोस?’ तेव्हा तो चपापला. कारण कोणीच नसायचे बरोबर. दुसऱ्या दिवशी तेच ! तिसऱ्या दिवशी तेच! शेवटी त्याने धाडस करून विचारले, ‘महाराज, मी तर एकटाच येतो, किती जणांना बरोबर आणतोस असे का म्हणता?’ ते म्हणाले, ‘अरे, मनामध्ये काय आहे? काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, मद आहे, मत्सर आहे, दंभ आहे !’ समर्थांनी तर प्रपंचालाच सहावा रिपू मानला आहे. आता काय करायचे? ज्या प्रपंचाला आम्ही कवटाळून बसतो, तो सहावा रिपू म्हणतात समर्थ ! मग त्याला कळले की अरे हे सगळे काढले पाहिजे चित्तातून ! त्यावेळी गुरुपदेश मिळेल.

तात्पर्य :- आपले चित्त हे शुद्ध व्हायला पाहिजे. चित्तशुद्धीनंतर धर्माचरणाचा, सदाचाराचा खरा अर्थ कळतो आणि धर्माधिष्टीत अर्थ-काम सेवन केल्यावर मोक्षाचा लाभही अपरिहार्य ठरतो.


व्यापक दृष्टिकोन

एकदा एक अनुभवी आणि वृध्द गुरू आपल्या शिष्याच्या तक्रारींना कंटाळून गेले होते. एके दिवशी सकाळी त्यांनी त्या शिष्याला थोडे मीठ आणायला सांगितले.तो शिष्य मीठ घेऊन परतला तेव्हा गुरूंनी त्या दुखी तरूणाला त्यातील मूठभर मीठ एका एका पाणी भरलेल्या पेल्यात टाकून ते पिण्यास सांगीतले. ’पाणी चवीला कसे लागले ?‘ गुरूंनी विचारले. ‘कडु’ असे म्हणून शिष्याने ते पाणी थुंकले.
  गुरूंनी मंद हास्य केलं आणि पुन्हा त्या शिष्याला मुठभर मीठ त्या तळयात टाकण्यास सांगितले. ते दोघे तळयाजवळ आले. शिष्याने मूठभर मीठ त्या तळयात मिसळल्यानंतर ते वृध्द गुरू म्हणाले, ‘आता या तळयातील पाणी पिऊन पहा.‘ त्याच्या हनुवटीवरून पाणी खाली ओघळल्यावर गुरूंनी त्याला विचारलं, आता यापाण्याची चव कशी आहे ?‘ ‘ताजी आणि मधुर !‘ शिष्याने सांगितले.  ‘आता तुला मिठाची चव लागतेय?‘  ‘नाही‘. गुरू त्या शिष्याच्या जवळ बसले आणि त्यांनी त्याचा हात आतात घेतला. ते म्हणाले, ‘आयुष्याची चवही अगदी मिठासारखीच असते.
         आयुष्यातील दुखही तेवढच असतं, परंतु आपण ते दुख कशात मिसळतो यावर त्याचा कडवटपणा अवलंबुन असतो. म्हणून जेव्हा आापण दुखात असतो तेव्हा आपण एकच गोष्ट करू शकतो. ती म्हणजे, आपण आपल्या भावना व विचार व्यापक ठेवल्या पाहिजेत. पेला होणं थांबवून तळं होण्याचा प्रयत्न केला पाहिजे.


 पूर्वसंचित आणि प्रारब्ध 

संत जनाबाई एकदा आपल्या पतीस जेवण वाढत होत्या, पहिला घास घेताच पतीने तावातावाने जनीला मारावयास सुरुवात केली. "भाजीत मीठ का नाही?" तिला हुंदका फुटला. विठ्ठल समोर उभा राहिला. "विठ्ठला, तू इथे असतानाही तुझ्या भक्ताला अशा परिस्थितीतून जावं लागतंय ... कां ??" विठ्ठलाने जनीच्या डोक्यावर हात ठेवला. जनीला तिच्या पूर्वजन्माचे स्मरण झाले आणि तो क्षण तिच्या डोळ्यासमोर आला. पूर्वजन्मातली जनी एक राजकन्या होती. गायीसमोर तिने घास ठेवला आहे. गाय ते खाण्यास नकार देते आणि जनीने छडी उचलली. तिने गायीवर वळ उठवले परंतु गायीने ते खाण्यास नकारच दिला ... विठ्ठलाने जनीच्या डोक्यावरून हात उचलला. जनी भानावर आली. *विठ्ठल म्हणाला, "जनी, पूर्वसंचित आणि कर्म फळ कुणाला चुकलेले नाही. हे सर्व भोगूनच ह्या भवसागरातून तरून जावे लागते. तुझी भक्ती ह्या जन्मातली आहे तेंव्हा तुझे सर्व पूर्वसंचित ह्या जन्मी फेडून, माझ्या चरणी, चिरंतन समाधीत विलीन होशील".

तात्पर्य -  त्याचे तसेच का किंवा मला असे का नाही हे रडण्यापेक्षा कर्मभोगाची पातळी आपणच निश्चित करावी. चांगले कर्म करूनही फळ मिळत नसले तर जनीच्या ह्या कथेने समर्पक उत्तर आपणास मिळेल, पण चांगले कर्म करणे सोडू नका. हेच तुमच्या जीवनाचे ध्येय असावे.

स्वतः मधील दुर्गुण

आपल्या समाजाच्या हिताविषयी नेहमी झटणार्‍या शहाण्या हत्तीला असे वाटले की, प्राण्यांमध्ये कित्येक वाईट चाली असून त्या ताबडतोब सुधारल्या पाहिजेत. म्हणून त्याने सभा भरविली. त्या सभेत त्याने एक उपदेशपर असे मोठे भाषण केले. विशेष करून आळस, भयंकर स्वार्थ, दुष्टपणा, द्वेष, मत्सर या दुर्गुणांवर सविस्तरपणे टीका केली. श्रोत्यांपैकी बर्‍याच जणांना त्याचे भाषण शहाणपणाचे वाटले विशेषतः मनमोकळा कबुतर, विश्वासू कुत्रा, आज्ञाधारक उंट, निरुपद्रवी मेंढी व लहानशी उद्योगी मुंगी यांनी ते भाषण लक्षपूर्वक ऐकले. नेहमी कामात असलेल्या मधमाशीलादेखील ते भाषण आवडले, पण श्रोत्यांपैकी दुसर्‍या काहीजणांना फारच राग आला व त्यांना एवढे लांबलचक भाषण ऐकणे मुळीच आवडले नाही. उदा. वाघ व लांडगा यांना फार कंटाळा आला. साप आपल्या सर्व शक्तीनिशी फुसफुसू लागला व गांधील माशी व साधी माशी यांनी फार कुरकूर केली. टोळ तुच्छतेने सभेतून टुणटूण उडत निघून गेला. आळशी अजगराला राग आला व उद्धट वानराने तर तुच्छतेने वाकुल्या दाखविण्यास सुरुवात केली. हत्तीने ही गडबड पाहून आपला उपदेश खालील शब्दात संपवला, 'माझा उपदेश सर्वांना सारखाच उद्देशून आहे. पण लक्षात ठेवा की ज्यांना माझ्या बोलण्याने राग आला ते आपला अपराध कबूल करताहेत. निरुपद्रवी प्राणी मात्र माझं भाषण स्वस्थपणे ऐकताहेत.'

तात्पर्य - आपले दुर्गुण काय आहेत हे ऐकून घेणे माणसाला फारसे आवडत नाही.


योग्य निवड

प्राचीन भारतात नागार्जुन नावाचे एक महान रसायन शास्रज्ञ होऊन गेले. त्यांना एका सहाय्यकाची आवश्यकता होती. दोन तरुण या कामासाठी त्यांच्या मुलाखतीला आले. आचार्यानी दोघात एक पदार्थ दिला. व त्यापासून एक विशिष्ट रसायन तयार करून आणायला सांगितलं. या कामासाठी त्यांना तीन दिवसांचा अवधी दिला.दोघे उत्साहाने कामाला लागले. तीन दिवसांनी परत आले. आचार्यानी विचारले. कामात काही अडचणी आल्या तर नाही ना?
पहिला  अभिमानाने म्हणाला, "आईला ताप होता. वडील पोटदुखीनं हैराण झाले होते. भाऊ पडल्यामुळे हाडाला मार लागला होता; पण माझी साधना मी सोडली नाही. व हे रसायन तयार करून आणलं आहे. "दुसरा म्हणाला, "आचार्य, क्षमा असावी. मी घरी जात असता वाटेत एक वृद्ध रुग्ण दिसला. निर्धन होता. बिचारा. त्याला औषधोपचार करून त्याची व्यवस्था लावण्यात वेळ गेला. त्यामुळे आपण दिलेलं काम मी पूर्ण करु शकलो नाही.कृपया आणखी दोन दिवसांची सवड द्यावी."आचार्यांनी आपल्या सहाय्यक  म्हणून त्याचीच निवड केली.

तात्पर्य - ज्ञान असून ते जर योग्य वेळेला उपयोगात नाही आणले तर त्याचा काय उपयोग. समाजविन्मुख ज्ञानाचा काय उपयोग.




खरा न्याय

" एका गावात राम आणि शाम नावाचे दोन व्यापारी राहत असतात. ते एकमेकांचे खूप चांगले मित्र असतात. एक दिवस अचानक राम त्याची सर्व संपत्ती गमावतो. तो गरीब होतो. तो शामकडे मदतीसाठी येतो. शाम खूप दयाळू मनाने फार चांगला असतो. तो क्षणाचा हि विचार न करता,रामला आपल्या संपत्ती मधील अर्धा वाटा देऊन टाकतो.
शामच्या मदतीमुळे रामला फार आनंद होतो. तो शामला वचन देतो कि, जेव्हा कधी तुला मदत लागेल तेव्हा मी तुला अवश्य मदत करीन. खूप वर्षानंतर शाम गरीब बनतो. त्याला रामची आठवण येते आणि तो मदतीच्या अपेक्षेने रामकडे जातो. परंतु राम त्याला मदत न करता घरातून हाकलून देतो
शामला खूप वाईट वाटते . राम खूप बदललेला असतो.
 शामच्या एका नौकाराने हे सर्व ऐकलेले असते. तो राजाकडे जातो आणि राजाला सर्व गोष्ट सांगतो. राजा सगळे ऐकून घेतो. सगळी माहिती काढतो.
राजा शामला आणि रामला बोलावतो. राजा रामला त्याच्या वचनाची आठवण करून देतो. राजा लगेच रामला आदेश देतो कि, त्याने त्याची अर्धी मालमत्ता शाम बरोबर वाटून घ्यावी शामला योग्य तो न्याय मिळतो. शामने रामला अर्धी मालमत्ता दिली होती तशीच राम शामला देतो. आता खरा न्याय होतो.

तात्पर्य - खरा न्याय करावा.


 स्‍वामी अखिलानंद

स्‍वामी अखिलानंद हरिद्वारमध्‍ये गंगेकाठी आश्रमात रोज रामायणावर प्रवचन देत असत. एकेदिवशी ते शिष्‍यांसोबत गंगेकाठी चालत होते. तेव्‍हा त्‍यांना आश्रमाच्‍या शेजारी असलेल्‍या झाडांवर दोन माणसे बसलेली दिसली. शिष्‍यांना विचारल्‍यावर शिष्‍य म्‍हणाले, ते दोघे ग्रामीण भक्त असून ते कथा ऐकायला येत असल्‍याचे सांगितले. त्‍यांचे फाटलेले कपडे पाहून स्‍वामीजी विचार करू लागले, ह्या अडाणी लोकांना काय रामायणाचे अन भक्तीचे मर्म समजणार? प्रसादाच्‍या आशेने येत असतील दोघे दुसरे काय? त्‍यांनी त्‍या दोघांना बोलावले आणि रामभक्तीचे महत्‍व विचारले, दोघेही अडाणी आणि अचानक बोलावणे आल्‍याने भांबावले, त्‍यामुळे ते दोघेही एक शब्‍द स्‍वामीजींपुढे बोलूच शकले नाही. स्‍वामीजी रागवत म्‍हणाले, तुम्‍हाला रामायण कळत नसेल तर येत जाऊ नका, उगाच गर्दी वाढवू नका, रामायण संपल्‍यावर या तुम्‍हाला प्रसाद द्यायची व्‍यवस्‍था मी करतो.'' दोघेही बिचारे मान अपमानाची पर्वा न करता स्‍वामीजींना नमस्‍कार करून निघून गेले.
 दुसरे दिवशी मात्र स्‍वामीजींना खरी भक्ती काय असते हे पुरेपुर समजले, कारण रात्रभर मुसळधार पाऊस पडला आणि नदी भरून वाहू लागली, यायला वाटही नाही, स्‍वामींच्‍या आश्रमातही पाय ठेवायला जागा उरली नाही इतके पाणी झाले. रामायण कथन करण्‍यासाठी स्‍वामीजी आले पण समोर कुणीच श्रोता नाही इतक्‍यात स्‍वामीजींचे लक्ष समोरच्‍या झाडाकडे गेले तर कालचेच दोघे ग्रामीण भक्त त्‍यांच्‍या रोजच्‍या जागेवर झाडावर भिजलेल्‍या अवस्‍थेत रामायण ऐकण्‍यासाठी येऊन बसलेले दिसले. स्‍वामीजींना राहवले नाही व त्‍यांनी त्‍या दोघांच्‍या समोर लोटांगण घातले व त्‍यांच्‍या रामभक्तीला नमस्‍कार केला.

तात्पर्य - कुणालाही कमी समजू नये. कोण कुठल्या अधिकाराचा असेल ते सांगता येत नाही.


 सुभाषचंद्र बोस

कटकमध्‍ये जानकीनाथ बोस हे एक वकील होते. एका रात्री ते, त्‍यांची पत्‍नी व मुलगा सुभाष आपल्‍या घरात झोपले असता काही वेळाने त्‍यांच्‍या पत्‍नीला जाग आली व तिने पाहिले आपला मुलगा सुभाष जमिनीवर झोपला आहे. त्‍याला थंडी वाजेल अशी तिला भिती वाटू लागली. पत्‍नीने मुलाला जागे केले व विचारले,'' बेटा सुभाष, तुला असे जमिनीवर का झोपावेसे वाटले'' सुभाषने उत्तर दिले,''आई, आपले पूर्वज असणारे साधु संत,महात्‍मे, ऋषीमुनी हे सारेच जमिनीवर झोपत असत म्‍हणून मी ही जमिनीवर झोपणार आहे.'' आई म्‍हणाली,'' बेटा, ते महान होते आणि वयानेही मोठे होते. तुझे वय जमिनीची कठोरता सहन करणार नाही तू बाजेवर येऊन झोप.'' आई आणि मुलाच्‍या या चर्चेने जानकीनाथ बोस जागे झाले आणि त्‍यांनीही सुभाषला विचारले,'' सुभाष तुला जमिनीवर झोपायला कुणी शिकविले.'' 
सुभाष म्‍हणाला,''बाबा, गुरुजी सांगत होते साधु संत,महात्‍मे, ऋषीमुनी हे सारेच महापुरुष होते. तसेच ते जमिनीवर झोपत असत म्‍हणून मी ही जमिनीवर झोपणार आहे. मला महापुरुष व्‍हायचे आहे.'' जानकीनाथ बोस यांनी सुभाषला समजावले की,'' बेटा, जमिनीवर झोपून कुणी महान होत नसते तर कठोर तप, साधना आणि पीडीत मानवतेच्‍या सेवेतून व्‍यक्ती महान होते. आचरणात शुद्धता ठेवली तर मनुष्‍य महान होतो.'' सुभाषला वडीलांचे म्‍हणणे पटले व त्‍याने त्‍याचप्रमाणे वर्तन ठेवले व एक महान क्रांतीकारी हिंदूस्‍थानला मिळाला त्‍याचे नाव सुभाषचंद्र बोस. राष्‍ट्रासाठी संपूर्ण जीवन व्‍यतीत करून, समर्पण कसे असावे याचा संदेश देणारे जीवन त्‍यांनी जगले व वडीलांची शिकवण आचरणात आणली.

तात्पर्य - त्‍याग आणि समर्पणातूनच देशहित जपले जात असते.


सज्जनपणा

                     महात्मा गांधी एकदा आगगाडीतून प्रवास करत होते. त्यांच्या शेजारी बसलेला माणूस गाडीत पचकन थुंकला .गांधीजींनी त्यांच्या जवळ असलेला कागदाचा कपटा घेऊन ती थुंकी पुसून टाकली. त्या प्रवासाला राग आला. थोडया वेळाने तो पुन्हा मुद्दाम थुंकला. पुन्हा गांधीजींनी ती जागा पुसून स्वच्छ केली. असं ब-याचदा झालं .दरवेळी काहीही न बोलता गांधीजी ती जागा स्वच्छ करत होते. आणि दरवेळी त्या उतारूच्या रागाचा पारा मात्र चढत होता. शेवटी तो उतारू थुंकून -थुंकून थकला  , ओशाळला. त्याने गांधीजीची माफी मागितलीआणि त्यांना विचारलं  , " मी पुन्हा पुन : थुंकत होतो  , तरी तुम्ही दरवेळी स्वच्छता करत राहिलात  , असं का केलंत  ? " यावर गांधीजी म्हणाले , तू तुझं काम करत होतास आणि मी माझं  ! "
तात्पर्य  - जे चांगले वागतात  , ते नेहमी सज्जन असतात. त्यांच्यावर कितीही संकटं आली  , तरीही आपला सज्जनपणा ते कधीही सोडत नाही. पुण्य करीत राहणं  , हा त्यांचा स्वभाव गुणच असतो .


 वेडे सांबर

एक सांबर नदीत आपले रूप पाहत होते. पाहता पाहता ते मनाशी बोलू लागले, ''अहाहा, ही माझी शिंगे किती छानदार आहेत! ही किती शोभिवंत दिसतात! अशी चांगली शिंगे देवाने कोणालाही दिली नाहीत! पण हे पाय बाकी फारच वाईट आहेत! किती रोडके आणि घाणेरडे आहेत! अरेरे, यापेक्षा मला मुळीच पाय नसते तर किती बरे झाले असते!'' सांबर असा विचार करीत आहे तोच काही शिकारी तेथे आले! पावलांची चाहूल लागताच सांबर जीव घेऊन पुढे पळू लागले व पारधी मागे पाठलाग करू लागले. 
पळता पळता सांबराची शिंगे एका काटेरी झुडपात अडकली. सांबराने बरीच खटपट केली तरी शिंगे काही निघेनात! अखेर शिकारी लोकांनी येऊन सांबराला ठार मारले! मरताना ते बोलले, ''अरेरे, उगीच मी या पायाला नावे ठेवली! तेच बिचारे मला पळताना उपयोगी पडले! पण या शिंगांनी बाकी माझा जीव घेतला!''

तात्पर्य - जे वरून चांगले दिसते तेच चांगले नसते! जे उपयोगी पडते तेच खरोखर चांगले.


अनुकरण

एकदा एका राजाचा हत्ती अचानक लंगडायला लागला. बरेच वैद्य, उपचार झाले पण हत्तीच्या चालण्यात काही फरक पडेना. राजा खूपच चिंताग्रस्त झाला. याच दरम्यान त्या नगरीत भगवान बुद्धांच्या भिक्खूसंघाचे आगमन झाले होते. त्यामुळे कोणीतरी राजाला हत्तीच्या लंगडण्याविषयी भगवान बुद्धांना भेटण्याचा सल्ला दिला. राजाने तथागतांची भेट घेतली.
भगवान बुद्धांनी परिस्थिती पाहिली आणि हत्तीचा माहुत बदलण्यास सांगितले. तथागतांचा उपदेश मानून राजाने माहुत बदलला आणि काय आश्चर्य? हत्ती व्यवस्थित चालू लागला. राजाला आश्चर्य वाटले. राजाने तथागतांना विचारले, तथागत अनेक वैद्यांच्या औषधोपचाराचा हत्तीवर परिणाम झाला नाही. मात्र आपल्या केवळ उपदेशाने हत्ती व्यवस्थीत चालू लागला याचे रहस्य काय? तेव्हा तथागत म्हणाले, "रहस्य काहीच नाही, या हत्तीचा जो माहुत तो लंगडत चालत होता. आणि हत्ती त्याचे अनुकरण करत होता. त्यामुळे हत्तीचा माहुत बदलणे गरजेचे होते.
आपली अवस्था अशीच आहे. आपण सद्‌सद्‌ विवेक बुद्धीने विचार न करता अशा अनेक बाबींचे अंधानुकरण करीत आहोत, त्यामुळेच आपली वाटचाल लंगड्या हत्ती प्रमाणे सुरू आहे. आपली वाटचाल सुव्यवस्थीत होण्यासाठी आपला माहुत सदाचारी असला पाहिजे.


स्वकीयांकडून झालेला ञासाचे खरे दुःख

एक सोनार होता. त्याच्या दुकानासमोरच एका लोहाराचे दुकान होते. सोनार जेव्हा काम करत असे तेंव्हा सोनाराच्या दुकानातून हळू आवाज होत असे पण जेंव्हा लोहार काम करत असे तेंव्हा मात्र लोखंडाचे काम होत असल्याने मोठा आवाज होत असे. तो आवाज मोठा कर्णकर्कश असे. एके दिवशी सोनाराच्या दुकानातील एक सोन्याचा कण कसा कोण जाणे पण लोहाराच्या दुकानात जावून पडला. त्या सोन्याच्या कणाची भेट एका लोखंडाच्या कणाशी झाली. खूप दिवसांची ओळख असल्यासारखे ते एकमेकांशी बोलू लागले. सोन्याच्या कणाने लोखंडाच्या कणाला म्हंटले,"दादा, आपले दुःख तर खरे एकसमान आहे. 
दोघानाही आगीत तापवले जाते आणि हातोड्याने ठोकले जाते. मी तर बाबा चुपचाप हे सहन करतो, पण तुझे काय?" लोखंडाचा कण सोन्याच्या कणाकडे पाहून दुःखी स्वरात म्हणाला,"अरे ! तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. दोघानाही तापवणारी आग एकच आहे आणि ठोकणारा हातोडाहि एकाच धातूचा आहे. पण खरे दुःख याचे आहे कि तुला ठोकणारा हातोडा हा तुझा कोणीच लागत नाही पण मला ठोकणारा लोखंडाचा हातोडा हा नात्याने माझा भाऊच लागतो. दुसऱ्याने दिलेल्या दुःखापेक्षा स्वकीयांनी दिलेला त्रास हा अगदी हृदयात वार करून जातो."

तात्पर्य  - आपल्या माणसांकडून होणारा त्रास हा कायमच दुःखदायक वाटतो.


आत्मविश्वास

चित्तरंजन हे अतिशय हुशार परंतु कट्टर नास्तिक गृहस्थ म्हणून सर्वजण त्यांना ओळखत. म्हणूनच सहदेव महाराजांच्या कीर्तनाला त्यांना आलेले पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. सहदेव महाराज तर धर्माची, ईश्वराच्या अस्तित्वाची महती सांगणारे. आणि अशा धार्मिक विषयाशी संबंधित कार्यक्रमाला चित्तरंजन कसे काय आले ? हे कसे काय शक्य आहे ? म्हणून सर्वत्र मित्र काहीसे अचंबितच झाले. त्यांच्यापैकी एकाला न राहवल्याने त्याने अखेर चित्तरंजन यांना विचारलेच, '' भक्तिमार्गाची प्रवचने, कीर्तने ऐकायला जाणे आपल्याला पटते का ? आपल्या तत्त्वात ते बसते का ? नसेल तर आज येथे येण्याचे कारण काय ?''
चित्तरंजन म्हणाले, '' त्याचे असे आहे की, सहदेव महाराज आपल्या प्रवचनात जे सांगतात, त्यावर माझा मुळीच विश्वास नाही. परंतु आपण जे जे बोलतो, त्यावर महाराजांचा दृढ विश्वास आहे. आणि ज्याचा स्वतःच्या बोलण्यावर दृढ विश्वास आहे, अशा व्यक्तीचे बोलणे समजून घ्यायला मला आवडते.''

तात्पर्य - ज्याचा  स्वतः वर  विश्वास  असतो तो  खरच  महान.


  जीवन दरीतील दूरावा

एक छोटा मुलगा आईवर रागावला व म्हणाला ,"मला तू आवडत नाहीस ,मला तू आवडत नाहीस "शिक्षेच्या भितेतून तो घरातून पळाला व एका दरिजवळ गेला .तिथे तो पुन्हा ओरडला ,"मला तू आवडत नाहीस "दरीतून आवाज आला मला तू आवडत नाहीस .आयुष्यात पहिल्यांदा त्याने प्रतिध्वनि ऐकला होता .आपण कोणाला तरी आवडत नाही हे एकुण  तो नाराज झाला व पळत आई कड़े गेला व घडलेला सर्व प्रसंग त्याने आईला सांगितला.आईला म्हणाला त्या दरित कोणीतरी दृष्ट माणूस  आहे व त्याला मी आवडत नाही. आईला सर्व काही समजले ती म्हणाली तू पुनः दरिजवळ जा व म्हण की मला तू आवडतोस.
मुलगा दरिजवळ गेला व म्हणाला ,"मला तू आवडतोस. "दरीतून आवाज आला ,"मला तू आवडतोस."मुलाला आनंद झाला तो आई कड़े आला व आई ची माफ़ी मागु लागला व म्हणाला ,"आई मला तू फार आवडतेस."आईने त्याला घट्ट मिठी मारली .आईच्या डोळ्यात आनंद अश्रु आले.

तात्पर्य - आयुष्य हे प्रतिध्वनि सारखे आहे जे आपण देतो तेच आपल्याला परत मिळते.म्हणून आपण कोणाशी कसे वागावे ते आपले आपणच ठरवावे.कारण व्देषाने व्देष वाढते आणि प्रेमाने प्रेम वाढते.


 अनुभवाच्‍या जोरावर यश

 एका व्‍यापा-याने दुस-या प्रांतात जाऊन व्‍यापार करण्‍याचा निर्णय घेतला. त्‍याच्‍या शेजा-यानेही तोच निर्णय घेतला. पहिला व्‍यापारी म्‍हणाला, भाई आपण दोघेजण एकत्र जाण्‍याने अडचण निर्माण होईल एक तर तू पहिल्‍यांदा जा किंवा मला तरी जाऊ दे. दुस-या व्‍यापा-याने विचार केला, आपण पहिल्‍यांदा जाण्‍यात फायदा आहे, रस्‍त्‍याने सरळ गेलो तर बैलांना चारापाणी मिळेल. मनाला वाटेल त्‍या किंमतीवर सामान विकेन. त्‍याने पहिल्‍यांदा जाण्‍याचा निर्णय घेतला. पहिल्‍या व्‍यापा-याला वाटले, या व्‍यापा-याच्‍या जाण्‍याने गाडीवाट चांगली तयार होईल. याचे बैल कडक गवत खातील व माझ्या बैलांना चांगले मऊ गवत खायला मिळेल. नव्‍या खोदलेल्‍या विहीरीचे पाणी प्‍यायला मिळेल. शिवाय चांगल्‍या किंमतीवर सौदा करता येईल. 
दुस-या व्‍यापा-याच्‍या माणसांनी पाण्‍याने भरलेल्‍या घागरी बरोबर घेतल्‍या आणि प्रवासाला सुरुवात केली. वाटेत काही भिजून आलेले लोक त्‍यांना भेटले, त्‍या लोकांनी व्‍यापा-याला सांगितले, पुढे पाऊस खूप आहे, पाणी घेऊन जाण्‍याची गरज नाही. व्‍यापा-याने त्‍यांचा सल्‍ला ऐकला. त्‍या रात्रीच त्‍या व्‍यापा-याचा काफिला लुटला गेला. व्‍यापारीही मारला गेला.एक महिन्‍याने पहिला व्‍यापारी पण प्रवासाला निघाला, तेव्‍हा दरोडेखोराच्‍या माणसांनी त्‍यालाही खोटे बोलून भुलविण्‍याचा प्रयत्‍न केला पण पहिला व्‍यापारी त्‍यांच्‍या बोलण्‍याला भुलला नाही. व्‍यापा-याच्‍या माणसांनी दरोडेखोरांची माणसे कशी काय ओळखली असे व्‍यापा-याला विचारले असता व्‍यापारी म्‍हणाला, अरे या दिवसात या भागात पाऊस कसा पडेल हा साधा विचार मी डोक्‍यात आणला व दरोडेखोरांची माणसे मला कळून आली. व्‍यापारी पुढे गेला व त्‍याच्‍या धंद्यात अशा छोट्याशा गोष्‍टींमुळे तो यशस्‍वी झाला.

तात्‍पर्य :- अनुभवाने माणूस यशस्‍वी होतो.

अचूक निर्णय

चार जण प्रवासाला निघाले होते. चौघांनी मिळून एकच मोठी बॅग घेतली होती. त्यात त्यांचे कपडे, पैसे, सर्व सामान त्यांनी ठेवले होते. वाटेत एका म्हातारीचे घर लागले. तिच्या घरी ती  मोठी बॅग ठेवून ते चौघेही जेवायला गेले. जातांना त्यांनी त्या आजीला सांगितले होते. "आजी, आम्ही चौघे मिळून तुझ्याकडे येऊन बॅग मागू तेव्हाच तू आम्हाला बॅग दे. आमच्या चौघांपैकी बॅगची मागणी करतांना एकही जण कमी असल्यास तू बॅग देऊ नकोस" आजीने मान डोलावली नंतर असे घडले की, त्या चौघांपैकी एक जण आजीकडे आला आणि त्याने बॅग घेऊन तो तात्काळ पसार झाला.
मग ते तिघे आजीकडे आले. आणि त्यांना समजले की, त्याच्यापैकी चौथ्या माणसाने ती बॅग त्या आजीकडून नेली. ते तिघे संतापले. तेनाली रामनकडे गेले. घडलेली सर्व हकीकत त्यांनी सांगितली. आजीकडून नुकसान  भरपाई त्यांनी मागितली. तेनाली रामनने त्या तिघांना एक प्रश्न विचारला, तुम्ही चौघे मिळून बॅग मागितल्या नंतर म्हातारीने तुम्हला बॅग द्यावी, अशी तुमची अट होती ना ?
 "होय" तिघेही म्हणाले.
       "आजी तुम्हाला नुकसान भरपाई न देता तुमची बॅगच तुम्हाला परत करू इच्छिते. सबब, तुम्ही चौघे मिळून या ! तेनाली रामनने निकाल जाहीर केला. या निकालाने न्यायालयात हशा पिकला आणि त्या तिघांना कळून चुकले की, ते आपला दावा हरले आहेत.

तात्पर्य - सर्व बाजूंनी पाहून विचार करुनच चोख निर्णय द्यायला हवा.

  संघर्षच खरे जीवन 

एका गावात एक म्‍हातारी राहत होती. तिला मुलेबाळे नव्‍हती. ती आणि तिचा नवरा दोघेच होती. पती कसल्‍यातरी आजाराने ग्रस्‍त होता. ती रात्रंदिवस मोलमजुरी करून दिवस काढत होती. या म्‍हातारीबद्दल संपूर्ण गावात सहानुभूती होती. पण म्‍हातारी स्‍वाभिमानी असल्‍याने ती कोणाकडून कसलीच मदत घेत नसे. एकेदिवशी ती जंगलात लाकडे तोडण्‍यासाठी गेली होती. दिवसभर लाकडे तोडून ती दमली होती. लाकडांची मोळी बांधली पण ती मोळी झालेल्‍या श्रमामुळे तिला काही उचलली जाईना. त्‍याने ती वैतागली व मोठमोठ्याने बडबडू लागली,''देवा, आता या उतारवयात ही मोळी जर माझ्याचने उचलली जात नसेल तर मला तरी उचल बाबा.'' तिने तसे म्‍हणायला आणि मृत्‍युदेव तिकडून जायला एकच गाठ पडली. 
त्‍यांनी ते ऐकले व लगेच तेथे येवून ते म्‍हणाले, मी तुझा आवाज ऐकला आहे मी तुला घेऊन जायला तयार आहे.'' साक्षात मृत्‍यु समोर पाहून म्‍हातारी घाबरली आणि म्‍हणू लागली,'' मला आताच मरायचे नाही, मी जर मेले तर माझ्या आजारी पतीची सेवा कोण करील?. मी काही इतकीच काही म्‍हातारी नाही की मला ही मोळी उचलता येत नाही. मी उगीच गंमत करत होते. पण मला काय माहिती लगेच मला उचलायला तू लगेच येशील देवा. मला सोड बाबा एकटीला, जा तुझा तू.'' हे ऐकताच मृत्‍यूदेव निघून गेले आणि म्‍हातारीने पूर्ण ताकतीने लाकडाचा भारा उचलला व घरी गेली.   

तात्पर्य - जीवनापासून पळ काढणे म्‍हणजे समस्‍येचे निरसन नाही. संघर्षाला सामोरे जाणे, संघर्ष करत रा‍हणे, आपले नित्‍यकर्म करत राहणे यातच मानवी जीवनाचे सूत्र बांधले आहे.


  थोड जगुया समाजासाठी

तीन वाटसरू एका धर्मशाळेत एका रात्रीसाठी एकत्र आले असतात. तिथे स्वयंपाकासाठी एकच चूल आणि एकच भांडं असतं. तिघांनाही भूक लागलेली असते. मग ते एकत्र स्वयंपाक करायचा असं ठरवतात. चुलीवर भांडं ठेवून त्यात पाणी उकळायला ठेवतात आणि त्यात प्रत्येकानं आपापल्या जवळच्या तांदुळाची एक एक मूठ टाकायची असं त्यांचं ठरतं.पाण्याला उकळी फुटल्यावर त्यात तांदूळ टाकायची वेळ येते.
 पहिला वाटसरू विचार करतो तसंही बाकीचे दोघं एक एक मूठ तांदूळ टाकतीलच, तेवढा भात तिघांना पुरेल. मी कशाला माझे तांदूळ वाया घालवू? म्हणून तो स्वतःच्या पिशवीत हात घालून रिकामीच मूठ घेऊन येतो आणि पातेल्यावरचं झाकण बाजूला सारून तांदूळ आत टाकल्याचं नाटक करतो. गंमत म्हणजे अगदीअसाच विचार बाकीचे दोघंही करतात आणि पातेल्यात तांदूळ टाकल्याचा नुसता अभिनयच करतात.
थोड्या वेळानं ते झाकण दूर करून बघतात तेंव्हा अर्थातच पातेल्यात फक्त गरम पाणी असतं, भाताचा पत्ताच नसतो.  तिघांनाही चडफडत आणि एकमेकांना शिव्या देत उपाशीच झोपायला लागतं.

तात्पर्य - आपला भ्रम दूर सारून आपलीही मदत समाजात कशी उपयोगी येईल त्यानुसार समाजाच्या उपयोगी येण्याचा प्रयत्न करावा.


 श्रमाचे महत्त्व

धनासेठचा मुलगा  खूपच आळशी होता. घरात गडगंज संपत्ती व एकुलता एक लाडाचा त्यामुळे काम कधी करावंच लागलं नाही. तो आता २१ वर्षाचा झाला होता. शेठजींना काळजी पडली. याचे असे दे हरी पलंगावरी किती दिवस चालणार कसे होणार साठलेला पैसा किती दिवस पुरेल.दुसऱ्या दिवशी, त्यांनी मुलाला बोलावले व म्हणाले, 'हे बघ राम आज तू सकाळीच बाहेर जा. काहींतरी काम करून पैसे मिळवुन आण तरच तुला जेवायला मिळेल.'मुलाला काहीच कळेना. तो बहिणीकडे गेला तिने त्याला एक रूपया दिला. त्याने तो शेठजींचा हातावर ठेवला तर शेठजींनी तो विहीरीत फेकून दिला.दुसर्‍या दिवशी, आईकडून त्याला एक रूपया मिळाला. त्याने तो शेठजींचा हातावर ठेवला तर शेठजींनी पुन्हा तो विहीरीत फेकून दिला.
तिसर्‍या दिवशी, मात्र कोणीही पैसे द्यायचे नाहीत हे उमजल्यावर स्वारी घराबाहेर काम शोधायला पडली. पण काय काम करणार? बारा वाजेपर्यंत हिंडला. काम मिळेना. 
पोटात कावळे कोकलायला लागले.स्टेशनवरून एक जड बॅग घेऊन येणारा प्रवासी माणूस दिसला, त्याला हमाल हवा होता. हा धावत पुढे गेला. 'साहेब, इकडे आणा'.ती बॅग त्याने डोक्यावर उचलली. घामाघूम झाला. साहेबांनी आठ आणे हातावर ठेवले. घरी आला. शेठजींच्या हातावर आठ आणे ठेवले. दोन दिवसाप्रमाणेच शेठजींनी ते विहीरीत फेकले हा चवताळून उठला. 'बाबा अहो तेवढे आठ आणे मिळवायला मला किती वणवण करावी लागली आणि तुम्ही ते फेकून दिलेत?'शेठजींनी त्याला जवळ घेतले. पाठीवरून हात फिरवला, 'बाळा आता मला काही काळजी नाही कारण खर्‍या कष्टाची किंमत तुला आज कळली आहे.दोन दिवस ह्याच्या दुप्पट रक्कम मी फेकली पण तुला राग आला नव्हता, कारण त्या मागे तुझे कष्ट नव्हते.'

तात्पर्य : स्वकष्टाची कमाई तीच खरी कमाई.श्रमाचे महत्त्व तेव्हाच कळते जेव्हा आपण स्वतः कमवतो. 

 भविष्यातील यशस्वीता

एकदा स्वप्न आणि सत्य यांचे जोरदार भांडण झाले. विषय होता भविष्य घडविण्यात सर्वाधिक सहभाग कोणाचा ? दोघे ही खुप भांडले, झगडले पण निर्णय काही होईना. शेवटी या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ते आपल्या मानसपित्याकडे- ब्रम्हदेवाकडे गेले. ब्रम्हदेवाने त्यांना सांगितले, "ज्या कोणाचे हात आभाळाला टेकतील आणि तरीही ज्याचे पाय जमिनीवर आसतील, त्याचा भविष्या घडविण्यात निर्णायक सहभाग असतो". दोघेही परत आले. 
स्वप्नाने आधी प्रयत्न केला. एकच उडीत त्याचे हात आभाळाला टेकले, पण त्याचे पाय जमिनीपसुन केंव्हाच उचलले गेले होते. सत्याने नंतर प्रयत्न केला. त्याचे पाय कायम जमिनीवर होते, पण त्याचे हात आभाळापर्यंत कधीच पोचु शकले नाहीत. दोघांनीही खुप प्रयत्न केले, पण दोघांपैकी कोणीच यशस्वी होऊ शकले नाही. थकुन परत एकदा ते ब्रम्हदेवाकडे गेले, आणि या वेळेस ब्रम्हदेवाने त्यांना सांगितले, "भविष्य घडविण्यात सत्य, आणि स्वप्न या दोघांचाही सहभाग तितकाच मोलाचा असतो. खर्‍या अर्थाने यशस्वी भविष्य घडवायचे असेल, तर स्वप्नाला सत्याच्या खांद्यावर उभे राहयला हवे !.



 घामाचा पैसा
 धन्नाशेटचा मुलगा राम अगदीच आळशी. घरांत गडगंज संपत्ती. एकुलता एक लाडाचा. काम कधी करावंच लागलं नाही. आता २१ वर्षाचा झाला. शेठजींना काळजी पडली. याचे कसे होणार साठलेला पैसा किती दिवस पुरेल. दुसरे दिवशी त्यांनी मुलाला बोलावले व म्हणाले हे बघ आज तू सकाळीच बाहेर जा. काहींतरी काम करून पैसे मिळवुन आण तरच तुला जेवायला मिळेल' मुलाला काहीच कळेना. तो बहिणीकडे गेला तिने त्याला एक रूपया दिला. शेठजींनी तो विहीरीत फेकून दिला. दुसर्‍या दिवशी आईकडून घेतला तिसर्‍या दिवशी मात्र कोणीही पैसे द्यायचे नाहीत हे उमजल्यावर स्वारी घराबाहेर पडली स्वारी घराबाहेर काम शोधायला निघाली. पण काय काम करणार ? बारा वाजे पर्यंत हिंडला. काम मिळेना. पोटात कावळे कोकलायला लागले. 
स्टेशनवरून एक जड बॅग घेऊन येणारा माणूस दिसला त्याला हमाल हवा होता. हा धावत पुढे गेला. 'साहेब, इकडे आणा'. ती बॅग त्याने डोक्यावर उचलली. घामाघूम झाला. साहेबांनी आठ आणे हातावर ठेवले. घरी आला. शेठजींच्या हातावर आठ आणे ठेवले. दोन दिवसाप्रमाणेच शेठजींनी ते विहीरीत फेकले हा चवताळून उठला. 'बाबा अहो तेवढे आठ आणे मिळवायला मला किती वणवण करावी लागली आणि तुम्ही ते फेकून दिलेत ?' शेठजींनी त्याला जवळ घेतले. पाठीवरून हात फिरवला, 'बाळा आता मला काहीं काळजी नाहीं कारण खर्‍या कष्टाची किंमत तुला आज कळली. दोन दिवस ह्याच्या दुप्पट रक्कम फेकली पण तुला राग आला नव्हता कारण त्या मागे कष्ट नव्हते.'
तात्पर्य - स्वकष्टाची कमाई तीच खरी कमाई, जे असेल त्यात समाधानी असावे.


समाधान
एकदा एक भुंगा गुंजारव करत फिरत होता. तेव्हा त्याला एक चिमणी म्हणाली, 'मूर्खा, तू जो एकसारखा एकच आवाज काढत बसतो तो कशासाठी? वसंतऋतूत गाणारी कोकिळा, हिरव्यागार झाडाच्या फांदीवर बसून गाणारा बुलबुल यांची बरोबरी तुला कधीतरी करता येईल का?
तसे जमत नाही तर भिकार सूर एकसारखा काढून तू लोकांना कंटाळा का आणतोस?' भुंगा म्हणाला, 'अगं चिमणे, परमेश्‍वराने या जगात प्रत्येक व्यक्तीत निराळेपणा ठेवला आहे. वैचित्र्य असणे हा जगाचा नियम आहे, दुसर्‍याचा हेवा न करता ज्याने त्याने आपापल्या शक्तीचा उपयोग केला तर त्यात वाईट काय? जेव्हा कोकिळेचे गाणे बंद पडते किंवा बुलबुल मुका होतो तेव्हा एखाद्या सुंदर बागेत निर्जनता भासू न देण्यात माझ्या गरीबाचा उपयोग होतो.'

तात्पर्य - सर्व मनासारखे होत नाही, तर जे असेल त्यात समाधानी असावे.

   मनावरचे डाग

            एकदा एका गुरुमाउलींकडे एक व्यक्ती आली. त्याच्या अंगावरील कपडे चिखलाने माखले होते. तो खूप थकलाभागला होता. गुरूंनी विचारले, ‘काय रे, फार थकला आहेस, काय झाले थकायला?’ तो म्हणाला, ‘काय सांगू? माझ्या मनावर व डोक्यावर खूप तणाव आहे. आणि माझी अडचण समजण्याऐवजी सगळे माझ्या अवस्थेकडे पाहून माझी टिंगल करत आहेत. त्याचा मला अतिशय त्रास होतोय.’ गुरूंनी कारण विचारल्यावर त्याने सांगितले, ‘सकाळी कामावर जात असताना घाईगडबडीत चिखलामध्ये पडलो, तेव्हापासून ज्याला मी हे सांगत आलो, तो प्रत्येकजण मला हसला. पडण्याच्या त्रासाबद्दल कुणी विचारलेसुद्धा नाही.’
            तेव्हा गुरू त्याला समजावत म्हणाले, ‘मित्रा, या एवढय़ाशा गोष्टी मनाला लावून घेऊ नकोस. चिखलाचा शरीरावर पडलेला डाग पाण्याने स्वच्छ धुवून जाईल, पण मनावरचे अपमानाचे डाग, त्यामुळे होणारा त्रास याचे काय? लोक माझा सारखा अपमान करतात, असा संभ्रम एकसारखा मनात राहिला तर तो उत्तरोत्तर वाढत राहील. त्यापेक्षा जर तू सुरुवातीच्या व्यक्तीसोबतच तुझ्या स्थितीवर हसला असतास तर तुझ्या मनावर असे दडपण आले नसते आणि शरीराचा त्रासही जाणवला नसता. आले लक्षात?

    आंधळा सूड

          एका सापाच्या डोक्यावर एक गांधीलमाशी बसली व दंश करून ती त्याला सतावून सोडू लागली.
साप त्यामुळे अगदी वेडापिसा झाला. काय करावे व तिच्या तडाख्यातून कसे सुटावे, हे त्याला मुळीच कळेना. रागारागाने तो तिचा सूड उगवण्यासाठी मार्ग शोधू लागला.
         तेवढयात तेथून एक बैलगाडी जाताना त्याला दिसली. सापाने आपल्या शत्रूला ठार करण्यासाठी तत्काळ त्या बैलगाडीच्या चाकाखाली आपले डोके ठेवले. त्या चाकाखाली ती गांधीलमाशी चिरडून मेलीच, पण तिच्याबरोबर त्या सापाचीही सपाटपोळी झाली.

 तात्पर्य : - आपल्या शत्रूंना जिवंत ठेवण्यापेक्षा काही लोक त्यांच्याबरोबर स्वत:चाही मृत्यु झालेला पत्करतात. सूडाने आंधळी झालेली माणसे आत्मघात व समाजघातच करतात.



No comments:

Post a Comment