Popular Posts

Tuesday, July 13, 2021

वाचन ऑडिओ

 https://drive.google.com/file/d/1yxn3FjOXzQa_85w6VFO45bnB81FFowl_/view?usp=drivesdk

रानवेडी इयत्ता  तिसरी

Thursday, April 23, 2020

शैक्षणिक चार्ट

खालील चित्रे पहा व वाक्य तयार करा.
(१)🌹=   ------------------
(२)🐟= -------------------
(३)🦋= -------------------
(४)🦚= ------------------
(५)🍎= ------------------
(६)🍇= -------------------
(७)🥕= ------------------
(८)🌽= -------------------
(९)⚽= ------------------
(१०)🇮🇳= ----------------

Tuesday, April 21, 2020

बडबडगीते


कृतियुक्त बडबड गीते


१.     एवढी मोठी आजी

एवढी मोठी आजी, अरे मोठी मोठी आजी     ॥धृ॥
           
आजीनं कापले वांगे ग बाई वांगे ग
मामाच्या घरी आले टांगे ग बाई टांगे ग
एवढी मोठी आजी                         ॥१॥

आजीनं आणला कोंबडा ग बाई कोंबडा ग
मामानं केला  भांगडा ग बाई भांगडा ग
एवढी मोठी आजी                         ॥२॥

आजीनं केल्या चकल्या ग बाई चकल्या ग
मामा आमचा नकल्या ग बाई नकल्या ग
एवढी मोठी आजी                          ॥३॥

आजीनं केले लाडू ग बाई लाडू ग
मामाला पोटभर वाढू ग बाई वाढू ग
एवढी मोठी आजी , अरे मोठी मोठी आजी      ॥४॥

२. डांग डिंग डिंगा की ...

पाण्यात असतो झीगा - तुम्ही पाहिलात का सांगा  ? (खेळ)
अहो तुम्ही पाहिलात का सांगा  ? (५ वेळा)
डांग डिंग डिंगा की , डांग डिंग डिंगा की

कमळात असतो भुंगा  - तुम्ही पाहिलात का सांगा  ? (खेळ)
अहो तुम्ही पाहिलात का सांगा  ? (५ वेळा)
डांग डिंग डिंगा की , डांग डिंग डिंगा की (५ वेळा )

भुंगा वाजवतो पोंगा - तुम्ही पाहिलात का सांगा  ? (खेळ)
अहो तुम्ही पाहिलात का सांगा  ? (५ वेळा)
डांग डिंग डिंगा की , डांग डिंग डिंगा की ( खुप वेळा )

३. गंपूने केले साबणाचे फुगे
गंपूने केले साबणाचे फुगे
मोठे गेले पुढे, छोटे राहिले मागे
एक फुगा अहा अहा एक फुगा            ॥धृ॥

एक फुगा बाबांच्या चष्म्यावर बसला
गंपूला तो डोळाच वाटला ... एक फुगा     ॥१॥

एक फुगा ताईच्या केसांवर बसला
गंपूला तो मोतीच वाटला ... एक फुगा     ॥२॥

एक फुगा आईच्या हातावर बसला
गंपूला तो लाडूच वाटला ... एक फुगा      ॥३॥

एक फुगा दादाच्या पायावर बसला
गंपूला तो चेंडूच वाटला ... एक फुगा       ॥४॥

एक फुगा आजीच्या गालावर बसला
गंपूला तो पापाच वाटला ... एक फुगा      ॥५॥

४. टेकडीवर झाड होते
टेकडीवर झाड होते
टेकडीवर झाड होते - झाडाला खोड होते         ॥१॥

टेकडीवर झाड होते - झाडाला खोड होते
खोडाला फांद्या होत्या.                       ॥२॥

टेकडीवर झाड होते - झाडाला खोड होते
खोडाला फांद्या होत्या - फांद्यावर पानं होती      ॥३॥

टेकडीवर झाड होते - झाडाला खोड होते
खोडाला फांद्या होत्या - फांद्यावर पानं होती 
पानांत खोपा होता                         ॥४॥

टेकडीवर झाड होते - झाडाला खोड होते
खोडाला फांद्या होत्या - फांद्यावर पानं होती 
पानांत खोपा होता खोप्यात अंड होतं        ॥५॥

टेकडीवर झाड होते - झाडाला खोड होते
खोडाला फांद्या होत्या - फांद्यावर पानं होती 
पानांत खोपा होता - खोप्यात अंड होतं   
अंडयात पिल्लू होतं                        ॥६॥

टेकडीवर झाड होते - झाडाला खोड होते
खोडाला फांद्या होत्या - फांद्यावर पानं होती 
पानांत खोपा होता - खोप्यात अंड होतं   
अंडयात पिल्लू होतं पिल्लूला चोच होती      ॥७॥

टेकडीवर झाड होते - झाडाला खोड होते
खोडाला फांद्या होत्या - फांद्यावर पानं होती 
पानांत खोपा होता - खोप्यात अंड होतं   
अंडयात पिल्लू होतं - पिल्लूला चोच होती    
चोचीत दाणा होता - दाणा झाला चूर्रर्र
चिमणी उडाली भूर्रर्र ...                     ॥८॥







५. रामाचा मामा

रामाचा मामा शेतावर गेला,
रामाचा मामा, रामाची मामी शेतावर गेले हो शेतावर गेले...
रामाचा मामा, रामाची मामी, मामीचा नौकर शेतावर गेले हो शेतावर गेले....
रामाचा मामा, रामाची मामी, मामीचा नौकर, नौकराचा कुञा शेतावर गेले हो शेतावर गेले...
रामाचा मामा, रामाची मामी, मामीचा नौकर, नौकराचा कुञा, कुञ्याचे शेपूट शेतावर गेले हो शेतावर गेले...
रामाचा मामा, रामाची मामी, मामीचा नौकर, नौकराचा कुञा, कुञ्याचे शेपूट, शेपटावरची माशी शेतावर गेले हो शेतावर गेले....
रामाचा मामा, रामाची मामी, मामीचा नौकर, नौकराचा कुञा, कुञ्याचे शेपूट, शेपटावरची माशी, माशीचे पंख शेतावर गेले हो शेतावर गेले...
रामाचा मामा, रामाची मामी, मामीचा नौकर, नौकराचा कुञा, कुञ्याचे शेपुट, शेपटावरची माशी, माशीचे पंख, पंखावरची घाण शेतावर गेले हो शेतावर गेले...

६. येरे येरे पावसा
येरे येरे पावसा तुला देतो पैसा.
पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा.
ये ग ये ग सरी माझे मडके भरी.
सर आली धावून मडके गेले वाहून.

७. या बालांनो या रे या

या बालांनो या रे या !
लवकर भरभर सारे या !

मजा करा रे मजा करा !
आज दिवस तुमचा समजा.

स्वस्थ बसे  तोचि फसे;
नवभूमी  दाविन मी
या नगराला लागुनिया
सुंदर ती दुसरी दुनिया.

खळखळ मंजुळ गाति झरे
गीत मधुर चहुबाजु भरे
जिकडेतिकडे फुलें फळें
सुवास पसरे रसहि गळे.

पर ज्यांचे  सोन्याचे
ते रावे हेरावे
तर मग कामे टाकुनिया
नवी बघा या ही दुनिया !

पंख पाचुचे मोरांना
टिपति पाखरें मोत्यांना
पंख फडकती घोड्यांना
मौज दिसे ही थोड्यांना.

चपलगती हरिण किती !
देखावे देखावे.
तर मग लवकर धावुनिया
नवी बघा या ही दुनिया !
८. चांदोबा चांदोबा भागलास का ?

चांदोबा चांदोबा भागलास का ?
निंबोणीच्या झाडामागे लपलास का ?

निंबोणीचे झाड करवंदी
मामाचा वाडा चिरेबंदी.

आई-बाबांवर रुसलास का ?
असाच एकटा बसलास का ?

आता तरी परतुनी जाशील का ?
दूध न्‌ शेवया खाशील का ?

आई बिचारी रडत असेल
बाबांचा पारा चढत असेल.

असाच बसून राहशील का ?
बाबांची बोलणी खाशील का ?

चांदोबा चांदोबा कुठे रे गेला ?
दिसता दिसता गडप झाला.

हाकेला '' माझ्या देशील का ?
पुन्हा कधी आम्हाला दिसशील का ?


९. रुसु बाई रुसु कोपर्‍यात बसु

रुसु बाई रुसु कोपर्‍यात बसु
आमच्यासंगे बोला आता ढिश्यू ढिश्यू ढिश्यू
हाहा..... ही ही....... हो हो

आता तुमची गट्टी फू
आल बाल बारा वर्षं बोलू नका कोणी
चॉकलेट नका दाखवू हं तोंडाला सुटेल पाणी

आमचा राजू का रुसला आमचा राजू का रुसला ?
सांगशील का माझ्या कानी राग तुझा कसला ?

गाल गोबरे गोरे गोरे लबाड डोळे दोन टपोरे
आनंदी हा चंद्र मुखाचा उदास का दिसला ?
राग तुझा कसला आमचा राजू का रुसला ?

बावन पत्ते बांधु वाडा शर्यत खेळू घोडा घोडा
घरदाराला खेळवणारा झाला हिरमुसला
राग तुझा कसला आमचा राजू का रुसला ?

चिमणी खाई मोती-दाणे गोड कोकिळा गाई गाणे
अल्लड भोळा गवई माझा अबोल का बसला ?
राग तुझा कसला आमचा राजू का रुसला ?

१०. ससा तो ससा की कापूस जसा
ससा तो ससा की कापूस जसा
त्याने कासवाशी पैज लाविली
वेगेवेगे धावू नि डोंगरावर जाऊ
ही शर्यत रे अपुली

चुरुचुरु बोले तो तुरुतुरु चाले
नि कासवाने अंग हलविले
ससा जाई पुढे नि झाडामागे दडे
ते कासवाने हळू पाहियले
वाटेत थांबले ना कोणाशी बोलले ना
चालले लुटुलुटु पाही ससा

हिरवीहिरवी पाने नि पाखरांचे गाणे
हे पाहुनिया ससा हरखला
खाई गार चारा घे फांदीचा निवारा
तो हळूहळू तेथे पेंगुळला
मिटले वेडे भोळे गुंजेचे त्याचे डोळे
झाडाच्या सावलीत झोपे ससा

झाली सांज वेळ तो गेला किती काळ
नि शहारली गवताची पाती
ससा झाला जागा तो उगा करी त्रागा
नि धाव घेई डोंगराच्या माथी
कासवा तेथे पाही ओशाळला मनी होई
'निजला तो संपला' सांगे ससा

११. गाडी आली गाडी आली - झुक्‌ झुक्‌ झुक्‌

गाडी आली गाडी आली - झुक्‌ झुक्‌ झुक्‌
शीटी कशी वाजे बघा - कुक्‌ कुक्‌ कुक्‌

इंजिनाचा धूर निघे - भक्‌ भक्‌ भक्‌
चाके पाहू तपासून - ठक्‌ ठक्‌ ठक्‌

जायचे का दूर कोठे - भूर्‌ भूर्‌ भूर्‌
कोठेहि जा नेऊ तेथे - दूर्‌ दूर्‌ दूर्‌

तिकिटाचे पैसे काढा - छ्न्‌ छ्न्‌ छ्न्‌
गाडीची ही घंट वाजे - घण्‌ घण्‌ घण्‌

गाडीमधे बसा चला - पट्‌ पट्‌ पट्‌
सामानाहि ठेवा सारे - चट्‌ चट्‌ चट्‌

नका बघू डोकावून - शुक्‌ शुक्‌ शुक्‌
गाडी आता निघालीच - झुक्‌ झुक्‌ झुक्‌

१२. अ आ आई, म म मका
अ आ आई म म मका
मी तुझा मामा दे मला मुका

प प पतंग आभाळात उडे
ढ ढ ढगांत चांदोमामा दडे
घ घ घड्याळ थ थ थवा
बाळ जरि खट्याळ तरि मला हवा

ह ह हम्मा गोड दूध देते
च च चिऊ अंगणात येते
भ भ भटजी स स ससा
मांडिवर बसा नि खुदकन हसा

क क कमळ पाण्यावर डुले
ब ब बदक तुरुतुरु चाले
ग ग गाडी झुक झुक जाई
बाळ माझे कसे गोड गाणे गाई

१३. ए आई, मला पावसात जाऊ दे
ए आई मला पावसात जाउ दे
एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे.

मेघ कसे बघ गडगड करिती
वीजा नभांतुन मला खुणविती
त्यांच्यासंगे अंगणात मज खूप खूप नाचु दे.

बदकांचा बघ थवा नाचतो
बेडुकदादा हाक मारतो
पाण्यामधुनी त्यांचा मजला पाठलाग करु दे.

धारेखाली उभा राहुनी
पायाने मी उडविन पाणी
ताप खोकला शिंका सर्दी वाट्टेल्‌ ते होऊ दे.

१४. शाळा सुटली पाटी फुटली

शाळा सुटली पाटी फुटली
आई मला भूक लागली

शाळा सुटता धावत सुटले
ठेच लागुनी मी धडपडले
आई मजला नंतर कळले
नवीन कोरी पाटी फुटली

धम्मक लाडू चापट पोळी
नको देउ मज हवीच गोळी
किंवा दे ग खमंग चकली
दे ना लवकर भूक लागली

सायंकाळी जाउ दे मला
पटांगणावर खेळायाला
तिथे सोबती वाट पाहती
दे ना खाऊ भूक लागली

१५. गोरी गोरीपान फुलासारखी छान

गोरी गोरीपान फुलासारखी छान                  
दादा मला एक वहिनी आण

गोर्‍यागोर्‍या वहिनीची अंधाराची साडी
अंधाराच्या साडीवर चांदण्यांची खडी
चांदण्याच्या पदराला बिजलीचा वाण !

वहिनीला आणायाला चांदोबाची गाडी
चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी
हरणांची गाडी तुडवी गुलाबाचे रान !

वहिनीशी गट्टी होता तुला दोन थापा
तुला दोन थापा तिला साखरेचा पापा
बाहुल्यांच्यापरी होऊ दोघी आम्ही सान !

१६. छम्‌ छम्‌ छम्‌..... छम्‌ छम्‌ छम्‌

छम्‌ छम्‌ छम्‌..... छम्‌ छम्‌ छम्‌
छडी लागे छमछम विद्या येई घमघम
छम्‌ छम्‌ छम्‌..... छम्‌ छम्‌ छम्‌

मोठ्या मोठ्या मिश्या डोळे एवढे एवढे लाल
दंतोजींचा पत्ता नाही खप्पड दोन्ही गाल
शाळेमधल्या पोरांना हा वाटे दुसरा यम
छम्‌ छम्‌ छम्‌

तंबाखूच्या पिचकार्‍यांनी भिंती झाल्या घाण
पचापचा शिव्या देई खाता खाता पान
'मोर्‍या मूर्खा !' 'गोप्या गद्ध्या !' देती सर्वा दम
छम्‌ छम्‌ छम्‌

तोंडे फिरवा पुसती गिरवा बघु नका कोणी
हसू नका रडू नका बोलू नका कोणी
म्हणा सारे एकदम ओ नमा सिद्धम्‌
छम्‌ छम्‌ छम्

१७. झुक झुक झुक झुक अगीनगाडी

झुक झुक झुक झुक अगीनगाडी
धुरांच्या रेघा हवेत काढी
पळती झाडे पाहूया
मामाच्या गावाला जाऊया

मामाचा गाव मोठा
सोन्याचांदीच्या पेठा
शोभा पाहुन घेऊया

मामाची बायको गोरटी
म्हणेल कुठली पोरटी
भाच्यांची नावे सांगूया

मामाची बायको सुगरण
रोज रोज पोळी शिकरण
गुलाबजामुन खाऊया

मामा मोठा तालेवार
रेशीम घेईल हजार वार
कोट विजारी लेऊया

१८. देवा तुझे किती सुंदर आकाश

देवा तुझे किती सुंदर आकाश,
सुंदर प्रकाश सूर्य देतो |

सुंदर चांदण्या, चंद्र हा सुंदर,
चांदणे सुंदर पडे त्याचे |

सुंदर ही झाडे, सुंदर पाखरे,
किती गोड बरे गाणे गाती |

सुंदर वेलींची सुंदर ही फुले,
तशी आम्ही मुले देवा तुझी |

इतुके सुंदर जग तुझे जर,
किती तू सुंदर असशील |

१९   फूलपाखरू झालो रे मी फूलापाखरू झालो

फूलपाखरू झालो रे मी फूलापाखरू झालो,
फुलाफुलांचे पंख लावुनी बागेमध्ये आलो |

मऊमऊ माझ्या पंखांची, नक्षी सुंदर रंगांची,
धुक्यात फिरता इकडे तिकडे दंवबिंदूंनी न्हालो |

फुलाफुलावर बसतो मी, खुदकन गाली हसतो मी,
डोळे मिटुनी थेंब मधाचे मिटक्या मारीत प्यालो |

नकाच लागू पाठी रे, नका धरु मज हाती रे,
क्रूरपणा हा बघुनी तुमचा मनोमनी मी भ्यालो |

२० असावा सुंदर चॉकलेटचा बंगला

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला.

चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार.

गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
'हॅलो हॅलो !' करायला छोटासा फोन.

बिस्कटांच्या गच्‍चीवर मोर छानदार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाललाल.

चांदीच्या झाडामागं चांदोबा रहातो
मोत्यांच्या फुलांतून लपाछपी खेळतो.

उंच उंच झोक्याचा खेळ रंगला
मैनेचा पिंजरा वर टांगला.

किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला.

२१ तुझ्या गळां माझ्या गळां

तुझ्या गळां माझ्या गळां
गुंफू मोत्यांच्या माळा
ताई आणखि कोणाला?
चल रे दादा चहाटळा.

तुज कंठी मज अंगठी
आणखि गोफ कोणाला?
वेड लागले दादाला
मला कुणाचे? ताईला.

तुज पगडी मज चिरडी
आणखि शेला कोणाला?
दादा सांगू बाबांला?
सांग तिकडच्या स्वारीला.

खुसू खुसू गालिं हसू
वरवर अपुले रुसू रुसू.
चल निघ येथे नको बसू
घर तर माझे तसू तसू.

कशी कशी आज अशी
गंमत ताईची खाशी.
अता कट्टी फू दादाशी
तर मग गट्टी कोणाशी?
२२    चांदोबा लपला झाडीत

चांदोबा लपला झाडीत
आमच्या मामाच्या वाडीत.

मामाने दिली साखरसाय
चांदोबाला फुटले पाय.

चांदोबा गेला राईत
मामाला नव्हत माहित.

२३ नाच रे मोरा अंब्याच्या वनांत
नाच रे मोरा अंब्याच्या वनांत
नाच रे मोरा नाच !

ढगांशी वारा झुंजला रे
काळाकाळा कापुस पिंजला रे
आतां तुझी पाळी वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच !

झरझर धार झरली रे
झाडांचि भिजली इरलीं रे
पावसांत न्हाऊं काहीतरी गाऊं
करुन पुकारा नाच !

थेंबथेंब तळ्यांत नाचती रे
टपटप पानांत वाजती रे
पावसाच्या रेघांत खेळ खेळु दोघांत
निळ्या सौंगड्या नाच !

पावसाचि रिमझिम थांबली रे
तुझीमाझी जोडी जमली रे
आभाळांत छान छान सातरंगी कमान
कमानीखाली त्या नाच !

२४  सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय ?

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय ?
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ?

भोलानाथ दुपारी आई झोपेल काय ?
लाडू हळूच घेताना आवाज होईल काय ?

भोलानाथ भोलानाथ खरं सांग एकदा
आठवड्यातनं रविवार येतील का रे तीनदा ?

भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर ?

२५  किलबिल किलबिल पक्षी बोलती,
किलबिल किलबिल पक्षी बोलती,
झुळझुळ झुळझुळ झरे वाहती |
पानोपानीं फुलें बहरती,
फूलपाखरें वर भिरभिरती |
स्वप्‍नीं आले काही,
एक मी गाव पाहिला बाई |

त्या गावाची गंमत न्यारी,
तिथे नांदती मुलेच सारी |
कुणी न मोठे, कुणी धाकटे,
कुणी न बसते तिथे एकटे |
सारे हसती, गाती नाचती,
कोणी रडके नाही |

नाही पुस्तक, नाही शाळा,
हवे तेवढे खुशाल खेळा |
उडो बागडो, पडो, धडपडो,
लागत कोणा नाही |

तिथल्या वेली गाणी गाती,
पर्‍या हासर्‍या येती जाती |
झाडांवरती चेंडु लटकती,
शेतांमधुनी बॅटी |
म्हणाल ते ते सारे होते,
उणे न कोठे काही |

२६ नको ताई रुसू, कोपर्‍यात बसू
नको ताई रुसू, कोपर्‍यात बसू,
येउ दे ग गालात खुदकन हसू |

इवल्याशा नाकावर मोठा मोठा राग,
देऊ काय तुला हवे ते ग माग,
नवरा हवा का लठ्ठ हवी सासू ?

बाहुलीच्या लग्‍नाचा खेळ गडे खेळू,
लग्‍नात बुंदीचे लाडू आता वळू,
नवीन कपड्यात छान छान दिसू |

चांदीचे ताट तुला चंदनाचा पाट,
केशरीभात केला आहे मोठा थाट,
ओठात आले बाई लडिवाळ हसू |

२७ पाऊस आला, वारा आला

पाऊस आला, वारा आला,
पान लागले नाचू |
थेंब टपोरे गोरे गोरे,
भरभर गारा वेचू ||

गरगर गिरकी घेते झाड,
धडधड वाजे दार कवाड |
अंगणातही बघता बघता,
पाणी लागे साचू ||

अंगे झाली ओली चिंब,
झुलू लागला दारी लिंब |
ओली नक्षी, पाऊस पक्षी,
कुणी पाहतो वाचू ||

ओसरुनी सर गेली रे,
उन्हें ढगांतुन आली रे |
इंद्रधनुष्यामध्ये झळकती,
हिरे माणके पाचू ||

२८   गोड गोजिरी, लाज लाजरी ताई तू होणार नवरी

गोड गोजिरी, लाज लाजरी ताई तू होणार नवरी,
फुलाफुलांच्या बांधुन माळा, मंडप घाला ग दारीं |

करकमलांच्या देठावरती चुडा पाचुचा वाजे,
हळदीहुनही पिवळा बाले रंग तुला तो साजे |
नथणीं-बुगडी लाजे,
रूप पाहुनी तुझे, बांधु ताई मणिमंगळसरीं |

भरजरी शालू नेसुनी झाली ताई आमुची गौरी,
लग्‍नमंडपी तिच्या समोरी उभी तिकडची स्वारी |
अंतरपाट सरे,
शिवा पार्वती वरे, लाडकी ही जाई ताई दुरीं |


२९ उठा उठा चिऊताई

उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडले
डोळे तरी मिटलेले
अजूनही अजूनही !

सोनेरी हे दूत आले
घरट्याच्या दारापाशी
डोळ्यांवर झोप कशी
अजूनही अजूनही !

लगबग पाखरे ही
गात गात गोड गाणे
टिपतात बघा दाणे
चोहीकडे चोहीकडे !

झोपलेल्या अशा तुम्ही
आणायाचे मग कोणी
बाळासाठी चारापाणी
चिमुकल्या चिमुकल्या !

बाळाचे मी घेता नाव
जागी झाली चिऊताई
उठोनिया दूर जाई
भूर भूर भूर भूर !


३० आपडी थापडी गुळाची पापडी
आपडी थापडी गुळाची पापडी
धम्मक लाडू तेल काढू.

तेलंगीचे एकच पान
दोन हाती धरले कान.

चाउ माउ चाउ माउ
पितळीतले पाणी पिउ
हंडा पाणी गडप.




३१  आजी बाई आजी बाई
आजी बाई आजी बाई
कुठे निघाला?
जाणार कुठे मी
जाते देवाला!

आजी बाई आजी बाई
बेल कशाला?
आज आहे सोमवार
महादेवाला!

आजी बाई आजी बाई
दुर्वा कशाला?
आज आहे मंगळवार
गणपतीला!

आजी बाई आजी बाई
हार कशाला?
आज आहे गुरुवार
दत्तगुरूला!

आजी बाई आजी बाई
तांदूळ कशाला?
आज आहे शुक्रवार
अंबाबाईला!

आजी बाई आजी बाई
तेल कशाला?
आज आहे शनिवार
मारूतीला!

३२ झुलतो झुला जाई आभाळा

झुलतो झुला जाई आभाळा
झूल्यासंगे झुलताना खुलतो ग बाई गळा !

लिंबाच्या फांदीला ग
झूला मी बांधिला
रेशमाचे लाल गोंडे माझ्या झुल्याला !

खालती वरती ग
वार्‍याला भरती
विमानांच्या वेगे माझा झुला चालला !

झूल्याच्या संगती
सूरही रंगती
वारा नेई माझे गाणे दूर देशाला !

ढुम् ढुम् ढोलकं,
पीं पीं बाजा |

आज आहे आमची,
खूप खूप मज्जा |

छान छान भावली,
भावलीचा नवरा |

लगीन लागलं,
पसारा आवरा |


३३ ल ल्ला लला ललला ल ल्ला लला ललला

ल ल्ला लला ललला ल ल्ला लला ललला

पप्पा सांगा कुणाचे ?  पप्पा माझ्या मम्मीचे !
मम्मी सांगा कुणाची ?  मम्मी माझ्या पप्पांची !

इवल्याइवल्या घरट्यात चिमणाचिमणी राहातात
चिमणा चिमणी अन्‌ भवती चिमणी पिल्लेही चिवचिवती !

आभाळ पेलते पंखांवरी पप्पांना घरटे प्रिय भारी
चोचीत चोचीनें घास द्यावा पिल्लांचा हळूच पापा घ्यावा !

पंखाशी पंख हे जुळताना चोचीत चोचही मिळताना
हासते नाचते घर सारे हासते छ्प्पर भिंती दारे !


३४  अग्गोबाई ढग्गोबाई लागली कळ

अग्गोबाई ढग्गोबाई लागली कळ
ढगाला उन्हाची केवढी झळ.

थोडी न्‌ थोडकी लागली फार
डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार.

वारा वारा गरागरा सो सो सूम्‌
ढोल्या ढोल्या ढगात ढुम ढुम ढुम.

वीजबाई अशी काही तोर्‍यामधे खडी
आकाशाच्या पाठीवर चमचम छडी.

खोलखोल जमिनीचे उघडून दार
बुडबुड बेडकाची बडबड फार.

डुंबायला डबक्याचा करूया तलाव
साबु-बिबु नको थोडा चिखल लगाव.


३५  असरट पसरट केळीचे पान
असरट पसरट केळीचे पान,
अनूने केला स्वयंपाक छान |

काढला केर, धुतले हात,
मांडला पाट, ठेवले ताट |

वरण-भात, लिंबाची फोड,
पुरी-भाजी, श्रीखंड गोड |

वाढलं ताटात, वाढलं वाटीत,
बाहुली बसली जिभल्या चाटीत |

सावकाश जेवा, पोटभर जेवा,
पोटभर जेवून ढेकर दया |

३६   चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली

चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली,
कढईतली पुरी मग गुरफुटुन बसली |

काही केल्या खुलेना, जरा सुद्धा फुलेना,
झार्‍यानं टोचलं, डेगीतलील्या पुसलं,
अशी थट्टा पुरीच्या काळजाला चटली |

पुरी झाली लाल, तिचे फुगले गाल,
मन आले भरू, डोळे लागले झरू,
तिथून उठून तरातरा ताटात जाऊन बसली |

खीर थंड झाली, वाटीत बसून आली,
लाडेलाडे खीर मग पुरीजवळ गेली,
"पुरीताई पुरीताई बघ जरा इकडे,
माझं म्हणणे ऐक गडे",
चार शब्द ऐकेल तर पुरी ती कसली |

तिकडून ताई आली, तिने युक्ती केली,
खिरीची नि पुरीची खूप गट्टी झाली,
तेंव्हापासून त्यांची जोडी पक्की होऊन बसली |

कढईतली पुरी मग,
कध्धी नाही रुसली |

३७ डोंगर पोखरुन उंदीर निघाला

डोंगर पोखरुन उंदीर निघाला,
मिशा फेंदारुन मांजराला म्हणाला |

दगड पचवून मला आली मस्ती,
आहेस का तयार खेळायला कुस्ती ?

उंदराचे तसले बोलणे ऐकून,
बिचारे मांजर गेले टरकून |

उंदराची स्वारी हसतच सुटली,
तेवढयात मांजराने तिथून धूम ठोकली |

मांजर धावत दूर दूर गेले,
जिथे डोंगर नाहीत तिथे जाऊन राहिले |



३८ टप्‌ टप्‌ टप्‌ काय बाहेर वाजतंय्‌ ते पाहू

टप्‌ टप्‌ टप्‌ काय बाहेर वाजतंय्‌ ते पाहू
चल्‌ ग आई, चल्‌ ग आई, पावसात जाऊ !

भिरभिरभिर अंगणात बघ वारे नाचतात !
गरगर गरगर त्यासंगे चल गिरक्या घेऊ !

आकाशी गडगडते म्हातारी का दळते ?
गडड्‍गुडुम गडड्‍गुडुम ऐकत ते राहू !

ह्या गारा सटासटा आल्या चटाचटा
पट्‌ पट्‌ पट्‌ वेचुनिया ओंजळीत घेऊ !

फेर गुंगुनी धरू, भोवर्‍यापरी फिरू
"ये पावसा, घे पैसा", गीत गोड गाऊ !

पहा फुले, लता-तरू, चिमणी-गाय-वासरू
चिंब भिजती, मीच तरी का घरात राहू ?


३९ खोडी माझी काढाल तर अशी मारीन फाइट

खोडी माझी काढाल तर अशी मारीन फाइट
घटके मध्ये विरून जाईल सारी तुमची ऐट !

अंगावरती याल तर असा देइन ठोसा
कोपर्‍यात जाउन तुम्ही रडत बसा !

बजरंग माझा भाऊ, भीम माझा काका
सांगुन ठेवतो पुन्हा माझ्या वाटे जाऊ नका !

दंड माझे पाहा कसे रोज दूध पितो
अंगामध्ये ताकद आहे मग कोण भितो ?


                ४० आईसारखे दैवत सार्‍या जगतावर नाही

आईसारखे दैवत सार्‍या जगतावर नाही
म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ आ ई
मुलांनो शिकणे अ आ ई

तीच वाढवी ती सांभाळी
ती करी सेवा तीन त्रिकाळी
देवानंतर नमवी मस्तक आईच्या पायी

कौसल्येविण राम न झाला
देवकीपोटी कृष्ण जन्मला
शिवरायाचे चरित्र घडवी माय जिजाबाई

नकोस विसरू ऋण आईचे
स्वरूप माउली पुण्याईचे
थोर पुरुष तू ठरून तियेचा होई उतराई


४१ राजा राणीची नको काऊ माऊची नको

राजा राणीची नको काऊ माऊची नको
गोष्ट मला सांग आई रामाची
वेळ आता झाली माझी झोपेची

राम हसायचा कसा राम रडायचा कसा
आकाशीचा चांदोमामा मागायचा कसा
समजूत कोणी घातली त्या वेड्याची ?

राम काळा का गोरा दिसत होता का बरा
मोठा भाऊ म्हणून त्याचा होता का तोरा
आवड होती का ग त्याला खेळाची ?

राम गेला का वनी त्याला धाडीला कुणी
भीती नाही त्याच्या कशी आली ग मनी


४२ एवढा मोठ्ठा भोपळा
एवढा मोठ्ठा भोपळा
आकाराने वाटोळा
त्यात बसली म्हातारी
म्हातारी गेली लेकीकडे
लेकीने केले लाडू
लाडू झाले घट्ट
म्हातारी झाली लठ्ठ.




४३ अपलम् चपलम्

अपलम् चपलम्,
चम् चम् चम् |

गुलाबाचे अत्‍तर,
घम् घम्‌ घम् |

इवलेसे फूल,
डुलु डुलु डुलु |

इवलासा थेंब,
टुळु टुळु टुळु |

इवलीशी कुपी,
छान छान छुक् |

बाळ गेला झोपी,
बोलू नका, शुक् |

४४ एक होते खोबरे

एक होते खोबरे,
गाल काळे गोबरे |

ताईला ते दिसले,
तिने त्याला किसले |

त्यात घातली साखर,
वेलची अन् केशर |

छान केली खिरापत,
अशी तिची करामत |

४५ अटक मटक चवळी चटक

अटक मटक चवळी चटक
चवळी लागली गोड गोड
जिभेला आला फोड फोड
जिभेचा फोड फुटेना
घरचा पाहुणा उठेना
जिभेचा फोड फुटला
घराचा पाहुणा उठला !!